मानवी भावभावनांची उत्कट ‘इच्छा’

0

मुंबई । जागतिक कीर्तीचे चित्रकार राबिन बार यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन इच्छा या शीर्षकांतर्गत मुंबईतील वरळी येथील प्रसिद्ध नेहरू सेंटर आर्ट गॅलरीत सुरू झाले आहे. हे प्रदर्शन रसिकांना 25 ते 31 जुलै 2017 यादरम्यान 11 ते 7 या वेळेत विनामूल्य पाहता येणार आहे. सदर प्रदर्शनातील कौशल्यपूर्ण कलाकृती जीवनातील अस्सल वास्तविकतेबद्दल भाष्य करणार्‍या असून ’इच्छा’ या विषयाभोवती गुंफलेल्या आहेत. मानवी भावभावनांची उत्कट आक्रमकता त्यांनी या चित्रांतून अधोरेखित केली आहे. आसामच्या सर्वात प्रसिद्ध कलावंतांपैकी एक म्हणून ओळखले जाणारे राबीन बार हे जगप्रसिद्ध आणि लोकप्रिय चित्रकार आहेत. पेंटिंग, शिल्पकला आणि कला इत्यादी क्षेत्रासह ते प्रसिद्धी माध्यमांतूनही अनेकांना परिचित झाले आहेत. सर्जनशील कल्पनांची रचना करण्याच्या त्यांच्या कलागुणांवर आधारित 45 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

3 मिनिटांत 30 स्केचेस
प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही हात आणि एका पायाने एकत्रितपणे त्यांनी तीन मिनिटांत 30 स्केचेस काढली आहेत. पश्चिम बंगालमधील हावडा येथे जन्मलेल्या राबीन बार हे बालपणापासून विलक्षण सर्जनशीलता दर्शवणारे एक चित्रकार आहेत.

दोन्ही हात आणि एका पायाने एकाचवेळी काढतात चित्रे
या कलावंताची खास ओळख म्हणजे ते दोन्ही हात आणि एका पायाने एकाचवेळी चित्रे काढतात. त्याचा त्यांनी दोनदा जागतिक विक्रम नोंदवला आहे. कलर्स टीव्ही, सोनी टीव्ही, झी टीव्ही, ईटीव्ही बांगला, ईटीव्ही मराठी, तामीळ, तेलुगू, न्यूज लाइन, झी न्यूज अशा आघाडीच्या वाहिन्यांवर त्यांनी अद्भुत शो सादर करून प्राइम टाइम स्पेशलच्या प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे.