पुणे । रक्षाबंधन या मधुर नात्याला सामाजिकतेची जोड देत नूमवि शाळेतील विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्लक्षित घटक असणार्या सफाई कर्मचार्यांसमवेत राखी पौर्णिमा साजरी केली. यावेळी 400 विद्यार्थ्यांनी एकत्र येत भव्य तिरंगी मानवी राखीतून सफाई कर्मचार्यांना अभिवादन केले.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात अप्पा बळवंत चौकातील नूमवि प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी सफाई कर्मचार्यांसमवेत रक्षाबंधन साजरे केले. यावेळी अभिनेत्री आणि लेखिका विभावरी देशपांडे, मुख्याध्यापिका आशा नागमोडे, सुनीता गजरमल आदी उपस्थित होते. सफाई कर्मचारी हे आपल्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहेत. भाऊ बहिणीचे रक्षण करतो, म्हणून राखीपौर्णिमेला बहीण त्याला राखी बांधते, त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेऊन सफाई कर्मचारी देखील आपले रोगराईपासून रक्षण करीत असतात. त्यामुळे त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी, असे विभावरी देशपांडे यांनी यावेळी सांगितले.
सफाई कर्मचार्यांमुळेच स्वच्छ आणि निरोगी जीवन आपण जगू शकतो. शालेय जीवनात स्वच्छतेचे महत्त्व आणि सफाई कर्मचार्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान विद्यार्थ्यांना कळावे यासाठी विद्यार्थ्यांच्या मानवी राखीतून सफाई कर्मचार्यांना अभिवादन करण्यात आले, असे पीयुष शहा यांनी सांगितले.