राहत्या घरातच घेतला गळफास ; लोकांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या ; मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतून घटनेचा उलगडा
नंदुरबार- मानव अधिकार फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.दिनेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नंदरुबार शहरातील चित्ते नगरात उघडकीस आल्याने खळबळ उडाली. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ.दिनेश पाटील यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली असल्याने त्यांच्या आत्महत्येचे गूढ वाढले आहे. चित्ते नगरातील दिनेश ढोमन पाटील (46) हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. चित्ते नगर जवळच असलेल्या एका प्लॅटमध्ये दुसर्या मजल्यावर त्यांचे मानवाधिकार फोरमचे कार्यालय असून या कार्यालयातून त्यांचे फोरमचे राष्ट्रीय स्तरावर नेटवर्क सुरू असायचे. दरम्यान चित्ते नगरमधील राहत्या घरातच त्यांनी पंख्याला दोरी बांधून गळ फास घेत आत्महत्या केल्याची घटना 3 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. डॉ.दिनेश पाटील यांनी तीन दिवसांपूर्वीच आत्महत्या केली असावी, दुर्गंधी आल्यावर ही बाब उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी घरातील टेबलावर सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. लोकांच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे, असे असले तरी सुसाईड नोटमध्ये आणखी इतर गोष्टी नमूद असून चौकशीत त्या उघड होतील, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. याबाबत डॉ.दिनेश पाटील यांची आई सिंधुबाई ढोमन पाटील (वैजाली ता.शहादा) यांनी नंदुरबार येथील उपनगर पोलीस ठाण्यात खबर दिली असून त्यानुसार प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.