सर्व रोगराईचे मूळ अस्वच्छतेमध्ये आहे याची जाणीव ठेवून त्यांनी महाराष्ट्राला मंत्र दिला. ज्या गावात किर्तनासाठी जात तेथे अगोदर हाती खराटा घेऊन स्वतः स्वच्छता करीत आणि रात्री किर्तनातून समाधी, साक्षात्कार, शकून-अपशकुन, गंडे, दोरे, ताईत, अंगारे, धुपारे या अंधश्रद्धांवर कोरडे ओढीत असत. बाबांनी दगड-धोंड्याची पुजा करण्याचा आणि बळी देण्याच्या प्रथांचा समाचार घेतला, दारु पिऊ नका, हुंडा घेऊ-देऊ नका, प्रकृती बरी नसेल तर अंगात येणार्या देवऋषाकडे न जाता डॉक्टराकडे जा असा ते उपदेश करीत असत. अस्पृश्यता हा मानव जातीला लागलेला कलंक आहे. देव देवळात नाही तर तो – माणसातच आहे. देव मानायचा असेल तर ज्या गांधीबाबांनी ‘चले जाव’ म्हणून ब्रिटिशांना हाकलून लावले त्या गांधीबाबांना माना. देव मानायचा असेल तर ज्या बाबासाहेबांनी दलितांना माणसासारखे जगायला शिकविले त्या बाबासाहेब आंबेडकरांना देव माना. असे किर्तनातून सांगणारे एकमेव किर्तनकार म्हणजे गाडगेबाबा म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनासाठी देशभर घोंघावणार वादळं होतं.
महात्मा ज्योतीबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात मोठे कार्य केले. राजर्षी छात्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी कार्य केले. महात्मा गांधी आणि डॉ. बाबा आमटे यांनी महारोग्यांसाठी कार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले. या सर्व महान व्यक्तींच्या कार्याचा एकत्रित समावेश गाडगेबाबांच्या कार्यात आहे “बापहो…! जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा, बायकोला लुगडे कमी भावाचे घ्या परंतु मुलाला, शिकविल्या बिगर राहु नका” असा नुसताच उपदेश त्यांनी केला नाही तर वंचित घटकांना शिक्षण पूर्ण करता यावे म्हणून त्यांनी शाळा, आश्रमशाळा व वसतीगृह उभारली. रोग्यांच्या आणि यात्रेकरुंच्या सोयीसाठी राजवाड्या सारख्या भव्य धर्मशाळा उभ्या केल्या, जागोजागी घाट आणि अन्नछत्र उभारली. बाबांनी आयुष्य भरात कोट्यावधी रुपयांचे ट्रस्ट स्थापन केले आणि जनतेतून विश्वस्त निवडून ते जनतेच्या हवाली केले. “सदर ट्रस्टमधील सुंतळीच्या तोड्यावर देखील गाडगेबुवा, त्यांचे वाली-वारस, नातेवाईक, सगे-सोयरे, शिष्य म्हणविणार्या कोणाचाही हक्क व अधिकार नाही. त्यांना अन्नछत्रात जेवण्याचा आणि धर्मशाळेत राहण्याचा देखील हक्क नाही” हे लिहीणारे गाडगेबाबा म्हणजे भगवत्गीते तील निष्काम कर्मयोगाचे जिवंत उदाहरण होय.
गाडगेबाबा निरझर होते. त्यांना गुरु मानणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रकांड पंडीत होते. गुरु-शिष्य म्हणजे अगदीच दोन धृ्रव. अस्पृश्यतेच्या यातना सोसणं असह्य झाल्यानंतर बाबासाहेबांनी धर्मातरांचा निर्णय घेतला तेव्हा सल्ल्यासाठी त्यांनी गाडगेबाबांची भेट घेतली. आपल्या मनातील वेदना त्यांनी गाडगेबाबांना सांगितल्या आणि म्हणाले “मी हिंदु म्हणून समाज माझ्यामागे पैशाच्या थैल्या घेऊन फीरत आहेत त्यासाठी मला तुमचा सल्ला हवा आहे” बाबांनी थोडा वेळ विचार केला आणि म्हणाले “देशाबाहेर आलेले दोन्ही तिन्ही रस्ते सोडा आणि योग्य मार्ग निवडा” बाबासाहेबांनी गाडगेबाबांचा सल्ला मानून बौद्ध धर्माचा स्विकार केला गाडगेबाबांचे तथाकथित हिंदु धर्मावर हे अनन्य उपकारच आहेत. गाडगेबाबांचे कार्य लोकोत्तर आहे. मदर तेरेसा म्हणतात, “संत गाडगे बाबांच्या सारखी विभूती जन्मास घालून ईश्वराने मनुष्य प्राण्यावर फार मोठे उपकार करुन ठेवले आहेत. प्रेमाची भूक ही खरी गरीबी आहे. श्री. संतगाडगेबांनी दिन-दुबळ्यांवर प्रेम केले, त्यांचे जीवन प्रेमावर आधारीत असून, त्यांनी ते कृतीत उतरविले” गाडगेबाबा म्हणजे जगाला उन्नतीची वाट दाखविण्यासाठी मानव धर्माच्या गाभार्यात अखंड तेवणारा नंदादीप आहे.
– संतोष शंकरराव बारी
मो. नं. 9372445151