मानव विकास कार्यक्रमासंबंधी 13 एप्रिलला बैठकीचे नियोजन

0

जळगाव । राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात मानव विकास कार्यक्रमांतर्गत समाविष्ट असलेल्या एकुण 125 तालुक्यापैकी निवडक 25 तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी एक विशेष योजना राबविण्याचा शासनाचा मानस असल्याचे सांगितले होते. या योजनेच्या माध्यमातून रोजगारयुक्त तालुके करण्याचे शासनाने ठरविले आहे. रोजगारयुक्त तालुके करण्यासाठी शंभर कोटी निधी देण्याची घोषणा करण्यात आले आहे. 25 तालुक्याचे निकष मंजुर करावयाचे असल्याने तसेच रोजगार निर्मिती व उत्पन्न वाढीचे लक्ष्य गाठण्यासाठी काही नवीन योजना घेणे आवश्यक असल्याने यासंबंधी चर्चा करण्यासाठी नियोजन अपर मुख्यसचिवांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी 13 एप्रिल रोजी औरंगाबाद येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा परिषदेतील अधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी अधिकार्‍यांकडे योजना विषयक काही कल्पना असल्यास मांडण्याचे सांगितले आहे.