ईश्वर हा शब्द भगवान, अल्ला, मसिहा, परमेश्वर, गॉड अशा कितीतरी शब्दांनी आपण उच्चारत असतो. मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारा हे आमचे श्रद्धेचे, विश्वासाचे स्थान असून, सुख-दुःखाचे चांगले वाईट क्षण आपण ईश्वराशी मनोमन संवाद साधून वाटून घेत असतो. ईश्वर आणि मानवाचे हे नाते कल्पित असले, तरी ते प्रत्येकाला हवेहवेसे वाटते. ईश्वर या शब्दातच संस्कार, शांती, दया, भक्ती, विश्वास, परोपकार, अहिंसा, सदाचार असे कितीतरी संस्कारित मूल्ये दडलेली असतात. जे आपल्याला घडवतात, वाईट प्रसंगांत मनःशांती देतात.ईश्वर म्हणजे, चांगले कर्म, सत्याचे आचरण आणि मानवतेची सेवा होय! गीता, कुराण, बायबल व अनेक धर्म ग्रंथांत हेच संस्कारित विचार आहेत. परंतु, आपण आपापल्या परीने त्या शब्दाची फोड केली.
ईश्वराच्या नावाने आपण एकमेकांचे जीव घेतोय! कोणी भगवा, कुणी हिरवा, कुणी निळा, तर कुणी लाल, अशा कितीतरी रंगांचे वलय लावून आपण ईश्वराची परिभाषाच बदलवून टाकली. त्यामुळे आज देशात धर्माच्या नावावर दगडफेक, हिंसाचार, अत्याचार, जाळपोळ याचे विदारक दृश्य दिसून येत आहे. जातीय व धार्मिक विद्वेषाचे पेव जागोजागी फुटलेले दिसून येत आहे. मग याला जवाबदार कोण? ईश्वराची खरी भक्ती कशात असते ती हिंसाचारात की मानवी सेवेत? ती श्रद्धेत की अंधश्रद्धेत? मला वाटते हे आपण कधी समजूच शकलो नाही. म्हणूनच रामरहिम आणि आसाराम बाबासारखे विषारी साप अजूनही आपल्याला दंश करत आहेत. ही आपल्या समाजाची शोकांतिकाच म्हणावी लागेल.
ऐसे कैसे जाले भोंदू । कर्म करोनि म्हणती साधू ॥ अंगा लावूनिया राख। डोळे झाकुनी करिती पाप॥
सोळाव्या शतकात संत तुकारामांनी वरील ओळीत भोंदुगिरीचा जाहीर निषेध केलेला होता. तो काळ म्हणजे अज्ञानरूपी अंधकाराचा! देव-धर्म, मंत्र-तंत्र, जादूटोणा आणि भूत-पिशाच्च याचे स्तोम माजलेले असताना त्याचाच फायदा घेत समाजात भोंदुगिरी अस्तित्वात आली. परद्रव्य व परनारी यांची अभिलाषा बाळगून समाजातील भोळ्याबाभड्या लोकांची फसवणूक करून त्यांचे आर्थिक शोषण करत. संत तुकारामानी बुवाबाजीचे अवडंबर माजवणार्या अशा पाखंडी, धूर्त भोंदू लोकांवर जळजळीत टीका करून धर्म व मानवतेची शिकवण दिली. संत सज्जन दिसतील जेथे। लोटांगणे जावे तेथे॥ असे अनेक संत सांगून गेले. पण ते संत कसे असावे? तर अखंड विश्वशांतीसाठी जप-तप करणारे, आपले ऐहिक हित सोडून मानवतेच्या सेवेसाठी आपले समस्त जीवन अर्पण करणारे असावे, मानव सेवा हाच त्यांचा मंत्र असायला हवा!
समाजातील अंधश्रद्धारूपी अज्ञान, अंधकार दूर करण्यासाठी गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, स्वामी विवेकानंद अशा अनेक थोर महंतांनी मानवता हीच ईश्वर सेवा आहे, देव देवळात नाही, तर माणसात आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केला. डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी भोंदुगिरी कायमची संपुष्टात यावी म्हणून रणसिंग फुंकले. त्यामुळे त्यांचा आवाज कायमचा बंद करण्यात आला, पण तरीही श्रद्धा अंधश्रद्धेतील फरक आपल्याला कळूच शकला नाही. आपण मात्र उन्हात, बिना चपलेने, अन्न पाणी विसरून, दिवसभर रांगेत लागून अंगाचे पाणी करण्याचे धन्यता मानत गेलो. हे कुठेतरी थांबायला हवे! डेरा सच्चा सौदा नामक पंथाचा आध्यात्मिक गुरू गुरमित रामरहिम सिंग या बलात्कारी बाबाचा चेहरा आताच आपल्या समोर आला. हरियाणा राज्यातील अवघ्या समाज मनावर राज्य करणार्या या भोंदू बाबाला अटक झाल्यानंतर झालेली जाळपोळ, हिंसाचार म्हणजे अवघ्या समाजमनाला लज्जित करून सोडणारी घटना होय. ज्या रामरहिम बाबाने किती तरी स्त्रियांना, मुलींना आपल्या वासनेचे शिकार केले, अशा बलात्कारी बाबाला अटकेतून मुक्त करण्यासाठी हजारो हात समोर येणे, अनेक भक्त जीव द्यायला तयार होणे, म्हणजे आपल्या अगतिकतेचे उत्तम उदाहरण होय! एकीकडे आपण ईश्वराच्या नावावर लाखो करोडो रुपयांचे दान करतो, तर दुसरीकडे आपल्या समाजातील गरीब, बेसहारा लोकांना दोन वेळेचे नीट खायला मिळत नाही. देश दारिद्य, बेकारी, गरिबीतून अजूनही मुक्त झालेला नाही. समाजाला अनेक विद्वान लोकांच्या विचारांची व आचारांची गरज आहे. महात्मा फुलेपासून तर डॉ. आंबेडकरांपर्यंत, बाबा आमटेपासून मदर टेरेसा, सिंधूबाई सपकाळ, अभिनेता नाना पाटेकर यांनी आपले जीवन समाजातील निराधार लोकांसाठी समर्पित केले.
आपण कोणत्याही एका जातीचे आहो, असा विचार न बाळगता मी या देशाचा एक नागरिक आहो, तेव्हा मी एक माणूस म्हणून जगेल आणि माणूस म्हणून मरेलही, असा प्रण आपण प्रत्येकांनी घ्यायला हवा. आपल्या मुलांना मानवतेचे संस्कार लहानपणापासूनच दिले तर येणारी पिढीसुद्धा मानवतेच्या या राज्यात आनंदाने जगू शकेल. चला तर आजच आपण संकल्प करू या. मानव सेवा हीच ईश्वर सेवा समजून कार्य करू या!
– प्रा. वैशाली देशमुख
नागपूर, कुही
7420850376