अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांचा आरोप
जळगाव : मानसी बागडे हीने आत्महत्या केल्यानंतर याठिकाणी समाजबांधवांची समजूत काढण्यास गेलेल्या पोलीस निरिक्षकांवर दगडफेक होते, जातपंचायीतच्या दबावातून समाजबांधव ही पोलिसांची बैठक उधळून लावतात, ही जिल्हा पोलीस दलासाठी शरमेची बाब आहे. केवळ गुन्हेगारी नियंत्रणात ठेवणे ही पोलिसांचे काम नाही. कायदा व सुव्यवस्थात नियंत्रणात ठेवणेही पोलिसांचे कर्तव्य आहेत. याच पोलीस दलाकडून जातपंचायतीसह पंचांना वाचविण्याचे प्रयत्न सुरु असल्याची शोकांतिका आहे. फरार असलेल्या पंच समारंभांना बिनधास्तपणे हजेरी लावताहेत, त्याच्या ठावठिकाण्याबाबत अंनिसला माहिती मिळते, मात्र पोलिसांना ते कसे सापडत नाही. अशा पोलिसिंगमुळे जातपंचायतीला पाठबळ मिळाले असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली असल्याची शोकांतिका महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी व्यक्त केली.
जातपंचायतीला कंटाळून मानसी बागडेने आत्महत्या केल्याच्या प्रकाराने राज्यभरात खळबळ उडाली. या जातपंचातींच्या पंचांना अटक करण्यासह इतर विषयावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीतर्फे गुरुवारी जिल्हा पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. पत्रकार परिषदेला अंनिसचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, अॅड. भरत गुजर, विश्वजीत चौधरी, सुरेश थोरात, आर.एस.चौधरी, मंगला नगरकर, जिल्हा महिला असोसिएशनच्या वासंती दिघे, अशफाक पिंजारी यांची उपस्थिती होती.
मयत मानसीची आई जगतेय दहशतीत
कृष्णा चांदगुडे म्हणाले, आज आपण काही पदाधिकार्यांसोबत कंजरवाडा परिसरात गेलो. याठिकाणी मानसी हिच्या आई बानो यांच्या घरी गेलो असता त्या प्रचंड दबावात दिसल्या. बुधवारी या परिसरात लग्न पत्रिका वाटप करण्यात आल्या; परंतु बानो यांच्या कुटुंबाला टाळण्यात आले. अशाप्रकारे बानोबाई हिला जातपंचायतीविरोधात तक्रार केल्यामुळे येथील कंजरभाट तिच्यावर समाजाने बहिष्कार टाकला आहे. त्यांच्याशी कोणीही बोलत नाही. जर कोणी बोलण्यास आले तर तक्रार मागे घेण्याबाबत दमदाटी करतात. आता बानोबाई हिने तक्रार मागे घ्यावी, यासाठी जातपंचायतीचे राज्यातील ठिकठिकाणचे पंच बानोबाई हिच्यावर दबाव टाकणार आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन बागडे कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्याची गरज आहे, अशी मागणी केली.
गुन्हा नोंदवितांना प्रशासनाचे बेजबाबदारपणाचे वर्तन
जातपंचायत संदर्भात प्रकरणात जिल्हाधिकार्यांना थेट हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. जिल्हाधिकार्यासह जिल्हा पोलीस प्रशासन अंनिसला तक्रार करायला लावतात. त्यामुळे अधिकार्यांनी या कायद्याची माहिती करून घेणे आवश्यक आहे, असे सांगून जिल्हाधिकार्याचे हे बेजबाबदारपणाचे वर्तन आहे किंवा ते अधिकाराचा वापर करत नाहीत अथवा त्यांचे अज्ञान आहे, अशा शब्दात अंनिस राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पोलीस अधीक्षकांसह अधिकार्यांचे वाभाडे काढले. तसेच याबाबत गृहमंत्री, तसेच सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे तक्रार संबंधित अधिकार्यांची तक्रार केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.
तक्रार करणार्या इंद्रेकरांची विभागांतर्गत चौकशी
नोव्हेंबर 2017 पासून ते जानेवारी 2020 पर्यंत अंनिसकडे 80 हुन अधिक जातपंचायत विरोधात तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पोलीस म्हणून अधिकार्यांनी संविधानाला फक्त अधिकारापर्यंत पाहू नये. सामाजिक न्याय, कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करण्यालाही प्राधान्य द्यायला हवे, असे सांगून अविनाश पाटील यांनी जातपंचायतीच्या दबाबातून इंद्रेकर यांची चौकशी करण्यात आली तसेच त्यांना धमकाविण्यात आल्याची माहिती दिली. 01 मार्च रोजी जळगाव येथे जातपंचायत मुठमाती अभियानाची परिषद आयोजित करण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.