मानहानीच्या दाव्यात तडजोडीची शक्यता

0

जळगाव। पॉली हाऊस प्रस्तावात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी अनुदान लाटले असा ठपका ठेवणारे ना.गुलाबराव पाटील यांच्यावर आमदार खडसे यांनी 5 कोटी रूपयांचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने मध्यस्थांच्या मदतीने सामंजस्याने मिटविण्यासाठी आज (29) रोजी दोघे नेत्यांमध्ये समोरासमोर चर्चा ठेवली होती. आमदार खडसे व ना.पाटील यांनी न्या. नांदेडकर यांच्या अ‍ॅन्टीचेंबरमध्ये 40 मिनिटे आपल्या वकीलासह चर्चा केली. आता न्यायालयाने 2 मे ही पुढची तारिख दिली आहे.

न्यायालयाचा पुढाकार
शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आमदार एकनाथराव खडसे यांनी पॉलीहाऊसचे अनुदान लाटले व मुक्ताईनगर सूत गिरणीसाठी 161 कोटी रुपये अनुदान घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे आमदार एकनाथराव खडसे यांनी राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर दिवाणी न्यायालयात 1/2016 प्रेसेशल सिव्हिल सुट नुसार 5 कोटींच्या अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. त्यात न्यायालयाने मध्यस्थीचा प्रयत्न केला व या दोघांनाही 29 एप्रिलला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते.

दोघांच्याही संमतीने चर्चेचा प्रस्ताव
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ना.गुलाबराव पाटील 29 रोजी दुपारी 2.15 वाजेला न्यायालयात उपस्थित होते. आमदार एकनाथराव खडसे हे 2.35 वाजेला न्यायालयात उपस्थित झाले. दुपारी 2.40 वाजेला न्या. आर.एन. नरेलीकर यांच्या न्यायालयात वादी व प्रतिवादी यांचे मध्यस्थी अर्ज देण्यात आले. दुपारी 3.05 वाजेला त्याला मंजुरी मिळाल्यावर तो न्या. का.पा.नांदेडकर यांच्याकडे देण्यात आला. 4.45 वाजेला ना.गुलाबराव पाटील व आमदार एकनाथराव खडसे चर्चा संपवून बाहेर पडले. न्यायालयाने 2 मे ही पुढील तारीख दिली आहे. न्या. एस. के. कुलकणी सुटीवर असल्यामुळे हा मध्यस्थीचा खटला न्य. नांदेडकर यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.