जळगाव प्रतिनिधी । येथील सुभाष चौकातील सुभाष चौक मित्रमंडळाची मानाची दहीहंडी वीर बाजीप्रभू मंडळाचा गोविंदा रोहित जगताप याने रात्री सव्वानऊच्या सुमारास फोडली.
सुभाष चौक मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी उपस्थित मित्र मंडळांपैकी पाच थर लावणार्या मंडळांनाच दहीहंडी फोडण्यासाठी संधी देण्यात येईल, असे जाहिर केले. वीर बाजीप्रभू मित्र मंडळाने पहिला प्रयत्न केला. या मंडळाच्या गोविंदांनी पाच थर लावण्याचा प्रयत्न करत सलामी दिली. यानंतर आयोजकांनी वीर बाजीप्रभू मित्र मंडळाला दहीहंडी फोडण्यासाठी बोलावले. ८.४० ला हंडी फोडण्यासाठी सलामी देत सुरुवात केली. पाच मिनिटात मुख्य मनोर्यांच्या बाजुला साईड मनोरे रचत पाच थरांची उभारणी केली. मात्र त्यांचा दुसरा प्रयत्नही अपयशी ठरला. यानंतर आयोजकांतर्फे सर्व सहभागी मंडळांच्या अध्यक्षांना व्यासपीठावर बोलावून पाच थर लावण्यासाठी पुन्हा सोडत काढण्यात आली. या वेळी वीर बाजी प्रभू मंडळाला संधी मिळाली. यानंतर पहिल्याच प्रयत्नात ९ वाजून १४ मिनीटांनी वीर बाजीप्रभू मित्र मंडळाने पाच धर लावत काठीने दहीहंडी फोडली.
वीर बाजी प्रभू मित्र मंडळाने पाच थर रचत दहीहंडी फोडल्याने या मंडळाला २१ हजार रुपये रोख बक्षिस देण्यात आले. तर श्रीराम मित्र मंडळाला सहविजेता घोषित करून त्यांना ११ हजार रुपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, आमदार चंदुलाल पटेल उपस्थित होते. यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत खटोड, उपाध्यक्ष मनिष अग्रवाल, खजिनदार अलोक अग्रवाल, प्रविण बांगर,हरिष चव्हाण, बापू कापडणे, बापू राजपूत, मयुर कासार, महेश गोला, गोपाल पाटील, मयुर कासार, प्रमोद भामरे, आदित्य खटोड, सचिन जांगड आदींनी परिश्रम घेतले.