मानाच्या गणपतींची वैभवशाली मिरवणूक

0

दहा तास चालला सोहळा : फुलांची उधळण, आकर्षक रथ, रांगोळीच्या पायघड्या…

पुणे । ढोल ताशांचा निनाद… सनई-चौघड्यांचे मंगलमय सूर… फुलांची उधळण… आकर्षक रथ… रांगोळीच्या पायघड्या अन् बाप्पांचा जयघोष… अशा भक्तिमय वातावरणात वैभवशाली मिरवणुकीने मानाच्या पाच गणपतींना मंगळवारी पुणेकरांनी भावपूर्ण निरोप दिला. सकाळी 10.30 वाजता सुरू झालेली ही मिरवणूक तब्बल नऊ तास चालली.

यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने गणेशभक्तांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत होता. तसेच मानाच्या पाच गणपतींच्या परंपरेनुसार काढण्यात आलेल्या मिरवणुका यावेळी ऐतिहासिक ठरल्या. शहरातील महात्मा फुले मंडई समोरील लोकमान्य टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी 10.30 वाजता मिरवणुकीला सुरुवात झाली. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, माजी खासदार सुरेश कलमाडी, आमदार निलम गोर्‍हे, मेधा कुलकर्णी, अनंत गाडगीळ, माधुरी मिसाळ, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, पालिका आयुक्त कुणाल कुमार, पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यासह पक्ष-संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया’चा जयघोषानंतर या ऐतिहासिक मिरवणुकीला सुरुवात झाली. बाप्पांच्या स्वागतासाठी राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांनी सर्व मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घातल्या होत्या. चौकाचौकांत कलाकारांनी निर्माण केलेली कलाकृती पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. मिरवणूक पाहण्यासाठी तरुणांनी भिंत व छप्परांचाही आधार घेतला होता. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व पथकांनी केलेल्या वादन अन् प्रात्यक्षिकांना उत्स्फूर्त दाद मिळत होती. कडक उन्हातही मिरवणुकीतील उत्साह उत्तरोत्तर वाढतच गेला.

मानाच्या पहिल्या कसबा गणपती
फुलांनी सजविलेल्या पारंपरिक पालखीत विराजमान झालेल्या मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक मार्गस्थ झाली. मिरवणुकीत प्रारंभी नगरावादन सुरू होते. त्यापाठोपाठ कलावंतांच्या पथकानेही नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते. सौरभ गोखले, अतुल गायकवाड, प्रवीण पटेल हे कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. यानंतर कामायनी संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांनी बँड वाजून बाप्पाला वंदन केले. मिरवणुकीत आर्ट ऑफ लिविंगचा जिवंत देखाव्याने लक्ष वेधून घेतले. त्यानंतर रमणबाग पथकाने वाजवलेल्या ढोल-ताशा पथकाने तर सर्वांना मोहिनी घातली. 4 वाजता बाप्पांचे नटेश्‍वर घाटावरील हौदामध्ये वाजत-गाजत विसर्जन झाले.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी
आर्कषक फुलांच्या मनमोहक चांदीच्या पालखीमध्ाून मानाचा दुसरा तांबडी जोगेश्‍वरी गणपती सकाळी 11 वाजता उत्सव मंडपातून मुख्य मार्गाकडे मार्गस्थ झाला. अतिशय भव्यदिव्य मिरवणुकीत सतीश आढाव यांच्या नगारा वादनाने वातावरण मंत्रमुग्ध झाले. टिळक चौकात भांडाराची उधळण करण्यात आली. यानंतर न्यू गंधर्व ब्रास बँडने आपली कला सादर केली. सिम्बायोसिस ईशान्य केंद्राच्या पूर्वोत्तर राज्यांतील विद्यार्थ्यांनी लोककला सादर केली. महिलांनी नाकात नथ, गळ्यात ठुशी, नऊवारी हा पारंपरिक साज घालून तर पुरुषांनी डोक्यावर फेटा अन् झब्बा कुर्ता घालून मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच यावेळी स्त्रीशक्तीच्या धाडसाचे दर्शनही मर्दानी खेळातून घडले. मानाच्या दुसर्‍या गणपतीचे विसर्जन 5.30 वाजता झाले.

मानाच्या तिसरा गुरुजी तालीम
दरवर्षीप्रमाणे यंदाही गुलालाची मुक्त उधळण करत, फुलांनी सजवलेल्या विविध वाद्यांच्या आकर्षक रथात मानाच्या तिसरा गणपतीचे म्हणजे गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला दुपारी 12.15च्या दरम्यान प्रारंभ झाला. गुलालाची मुक्त उधळण आणि ढोल-ताशा पथाकांचे दमदार वादन हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले. चेतक, शिवगर्जना या पथकांबरोबरच नगरकरबंधूंचे सनईं-चौघडा वादन मंगलमय वातावरणात भर घालत होते. पारंपरिक वेशभूषेतील महिला लेझीम खेळ सादर करत मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या. मंडळाने यंदाही बाप्पाभोवती सुरक्षारक्षकांचे कडे केले होते. वाजत-गाजत निघालेल्या बाप्पांचे संध्याकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी नटेश्‍वर घाट येथे विर्सजन करण्यात आले.

मानाच्या चौथा तुळशी बाग गणपती
गुरुजी तालीम पाठोपाठ गरुड रथात विराजमान असलेल्या मानाच्या चौथ्या तुळशी बाग गणपतीची मिरवणूक लक्षवेधी ठरली. दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी मिरवणुकीला प्रारंभ झाला. फुगड्या, कागदी फुलांची उधळण, लहानांबरोबरच मोठ्यांचा सहभाग असलेले तुळशी बाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. यामध्ये स्वरुपवर्धिनी पथाकतील मुलांनी सादर केलेली मल्लखांबची प्रात्यक्षिके, तलवारबाजी आणि लाठीकाठीच्या चित्त थरारक कसरतींना गणेशभक्तांनी उत्स्फूर्त दाद दिली. श्री गजलक्ष्मीचे ढोल-ताशा वादन, हिंद तरुण मंडळाचे ढोल व लेझीम वादनाने रंगत आणली. अशा प्रसन्नदायी वातावरणात सायंकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी श्रींच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

मानाचा पाचवा केसरीवाडा
बिडवे बंधूच्या नादमधुर सनई वादनाने केसरीवाडा गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला 1 वाजून 10 मिनिटांनी प्रारंभ झाला. फुलांनी सजवलेल्या पारंपरिक पालखीमध्ये बाप्पांची देखणी मूर्ती विराजमान झाली होती. समर्थ पथकाने मुलींची तलवार बाजीची प्रात्यक्षिके दाखवून स्त्रीशक्तीचा जणू जागरच केला. पुणेरी पगडी घातलेले वादक या पथकात सहभागी झाले होते. लोकमान्य टिळक आणि स्वामी विवेकानंद यांची 125 वर्षांपूर्वी झालेल्या भेटीचे स्मरण करणारा देखावा यावेळी केंद्रबिंदू ठरला. तसेच ढोल-ताशा पथकांनी केलेल्या वादनाने मिरवणुकीत रंगत आणली. तर शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाने ही दमदार वादन केले. श्रीराम पथकाने ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत उपस्थितांना भारावून टाकले. वाजत-गाजत निघालेल्या बाप्पांना भाविकांनी संध्याकाळी 7 वाजून 28 मिनिटांनी निरोप दिला.

श्रीमंत भाऊ रंगारी मंडळ
टिळक – भाऊ रंगारी वादाचे पडसाद
महापालिकेच्या वतीने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले जात असताना सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक कोण तसेच गणेशोत्सवाचे 125वे वर्ष की 126वे वर्ष? या वादाचे पडसाद मिरवणुकीत पाहायला मिळाले. महापौरांनी आरतीसाठी नाव पुकारले तेव्हा श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाचा रथ तसाच पुढे विसर्जन घाटाकडे निघून गेला.

श्रीमंत भाऊ रंगारी मंडळाची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून पहाटे साडेचार वाजता अलका चौकात आली, तेव्हा पाउणतास ढोल-पथकाने वादन केले. महापालिकेच्यावतीने महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि पालिकेचे पदाधिकारी यांच्या हस्ते आरतीसाठी मंडळाचे नाव पुकारले; परंतु भाऊ रंगारी मंडळाने आपला गणेशरथ तसाच पुढे विसर्जन घाटाकडे नेला. महापौर, मोहोळ आणि पदाधकारी आरतीसाठी मंडपातून निघाले होते. तरीही मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी मिरवणूक तशीच पुढे नेली.

भाऊ रंगारी मंडळाने विसर्जन मिरवणुकीतील रथावरदेखील ‘भाऊ रंगारी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक आणि लो. टिळक हे प्रसारक’ असल्याचा फलक लावला होता. महापालिका आणि राज्य शासनाने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष जाहीर केले आहे. मात्र सार्वजनिक गोणेशोत्सवाचे 125 वे वर्ष की 126 वे वर्ष, सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊ रंगारी की लोकमान्य टिळक हा वाद संपला नसल्याचे या मिरवणुकीत पाहायला मिळाले.

गेल्या वर्षी भाऊ रंगारी मंडळाने आपले शतकोत्तर रोप्यमहोत्सवी वर्ष साजरे केले आणि सार्वजनिक महोत्सवाचे जनक टिळक की रंगारी वादाला सुरुवात झाली ती यावर्षी देखील कायम आहे.

गेली 65 वर्षे श्रीमंत भाऊ रंगारी गणपती मंडळाच्या रथाचे सारथ्य पुण्याचे प्रथम नागरीक असणारे महापौर हे करत आले आहेत. मात्र यंदा भाऊ रंगारी गणपती मंडळ आणि महापौर यांच्यात गणेशोत्सवाचे जनक कोण यावरून वाद रंगला आहे. यामुळेच मंडळाने आमंत्रण देऊनही टिळक यांनी भाऊ रंगारी गणपती मिरवणुकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे गेली यंदा परंपरा खंडित झाली आहे.

अखिल मंडई मंडळ
देशभक्तीपर गीताचे सुरेल वादन। जयोस्तुते देशभक्तीपर गीताच्या सुरेल स्वरात बँड वादकांची शिस्तबद्ध मिरवणूक तसेच शिवगर्जना ढोल पथकांसह सकाळी साडेसहा वाजता अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गणेशाचे अलका चौकात आगमन झाले. हजारो भाविक चौकाच्या चारही बाजूंनी गर्दी करून दर्शनासाठी उभे होते. न्यू गंधर्व ब्रास बँडचे पथक गणवेशातील पथक अग्रभागी होते. गेली अनेक वर्षे हेच बँड पथक सेवा देत आहे. महापौर मुक्ता टिळक व स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी गणेशाची आरती केली. मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी सन्मान स्वीकारला. महापालिकेच्या क्रिडा समितीचे अध्यक्ष सम्राट थोरात हेही यावेळी उपस्थित होते. आरतीनंतर मिरवणूक रथ मार्गस्थ झाला.

दगडुशेठ हलवाई सार्वजनिक मंडळ
भाविकांचा जनसागर लोटला। स्वरूपवर्धिनी ढोल पथक आणि 125 ध्वजपथकांच्या ताफ्यासह प्रभात व दरबार बँडने गणेशाला मानवंदना दिली. सकाळी 7 वाजता अलका चौकात मिरवणूक आली. मंडळाचे अध्यक्ष अशोक गोडसे कोषाध्यक्ष महेश सुर्यवंशी यांचा महापालिकेच्या वतीने सत्कार करण्यात आला. महापौर मुक्ता टिळक यांनी काहीवेळ रथाचे सारथ्य केले. स्वरूपवर्धिनी ढोलपथकाने उत्कृष्ट खेळ करून भाविकांची मने जिंकली. विद्युत रोषणाई केलेल्या रथाचे आगमन होताच गणपतीचे दर्शन घेण्यासाठी एकच गर्दी उसळली. पारंपरिक वाद्यांबरोबर ध्वज पथकांची शानदार सलामी अलका चौकात भाविकांना पाहायला मिळाली. दगडुशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी पहाटे भाविकांचा जनसागर लोटला होता.