मुक्ताईनगर:- मानेगाव गाव रस्त्यावरील शेतात तसेच पुर्णानदी काठी सोमवारी सकाळी 7:00 वाजेच्या दरम्यान वाघाचा सादरणत: एक ते दिड वर्षा वयोगटाचा छावा दिसून आल्याने शेतकर्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऐणगाव वस्तीजवळच वाघ दिसून आल्याने जंगलात पाणी नसल्याने वाघांचा मुक्त संचार गाववस्त्यांकडे दिसून येत असल्याच बोलले जात आहे.
छाव्याला पाहताच वनविभागाची धाव
मानेगाव येथील शेतकरी बाळकृष्ण राणे यांचे मानेगाव पूर्णा नदीच्या काठाजवळ यांचे शेत आहे. राणे यांचा मुलगा वासुदेव राणे हा शेतात पाणी सुरू करण्यासाठी सोमवारी सकाळी सात वाजता जात होता. त्याचवेळी शेतामागील पूर्णा नदी परीसरातून एक भिल्ल व्यक्ती धावत पळत आला व शेतात वाघ असल्याने शेतात जावू नका अशी विनंती राणे यांना केली. त्यामुळे परीसरातील शेतकर्यांनी याबाबत तात्काळ वनविभागाला भ्रमणध्वनीवरुन माहिती दिली. यानुसार वनविभागाचे कर्मचारी वनरक्षक आर.एल.ठोसर, संचालाल पवार, वनमजुर रवींद्र डहाके तसेच शिवसेना उपशहरप्रमुख अमरदीप पाटील यांनी तात्काळ वाघ दिसलेल्या परीसराकडे धाव घेतली. वनविभागाच्या कर्मचार्यांसह तब्बल 20 ते 25 शेतकर्यांनी वाघाचे पायाचे ठश्याचा तीन किलोमीटर पर्यंत मागोवा घेतला. हे ठसे एक ते दीड वर्षाच्या वाघाच्या छाव्याचे असल्याची माहिती दिली असता वाघ ( छावा ) हा राणे यांच्या शेतातून योगेश कोलते यांच्या पपई लावलेल्या शेतातून तर पुढे जुने मानेगावं शिवारातील शेतशिवार तेथुन पलीकडील जुने उचंदे शिवार दिसून येतो तिथपर्यंत येवून गेल्याचे आढळून आले . पुढे हे वाघाच्या पायाचे ठसे मक्याच्या शेतात गेल्याचे दिसुन आल्याने वनकर्मचार्यांनी तेथे वाघा (छावा) ची माता वाघीण असण्याची दाट शक्यता वर्तविली. त्यामुळे परीसरातील शेतकर्यांनी शेतात वावरतांना काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.