मंगळवारी तहसील कार्यालयात तालुक्यातील सर्व यंत्रणांची बैठक
भुसावळ- पावसाळ्यात निर्माण होणार्या नैसर्गिक आपत्तीवर मात करता यावी यासाठी महसूल विभागाने तयारी केली असून मंगळवारी मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापनाच्या तालुक्यातील सर्व यंत्रणाची बैठक तहसील कार्यालयात आयोजित केली आहे. पावसाळ्यामध्ये नैसर्गिक आपत्तीत नैसर्गिक व जीवीतहानीची दाट शक्यता असते. यावर उपाय योजनांसाठी महसूल विभागाच्या माध्यमातून आपापल्या विभागात मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्रीय करणे आवश्यक असते. त्यानुसार भुसावळ महसूल विभागाने भुसावळ आणि वरणगाव नगरपालिका, महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीला रस्त्यावरील वीज तारांची देखभाल व दुरूस्ती, तालुका व नगरपालिका वैद्यकीय अधिकारी, भारत संचार निगम अधिकारी अशा अधिकार्यांना आवश्यक त्या लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हेतर तालुक्यातील सर्व यंत्रणा आपत्कालीन परीस्थितीत सज्ज राहण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात बैठकीचे आयोजनही केले आहे. बैठकीला आपत्ती व्यवस्थापनाशी संबधीत सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांना बैठकीला उपस्थित राहण्याची सुचना देण्यात आली आहे.
नियत्रंण कक्षाची स्थापना
माहे जून ते सप्टेंबर 2018 या मान्सुन कालावधीसाठी तहसील कार्यालयात नियत्रंण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शिवाय रात्र पाळीसाठी कर्मचार्यांना आदेश दिले असून मान्सुन काळात आपत्ती व्यवस्थापनासाठी शोध व बचाव पथकाची रचना करण्यात आली आहे. यामध्ये विविध विभागांच्या कर्मचार्यांचा समावेश आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचे आराखडे
आपत्ती व्यवस्थापनाच्या काळात तातडीने उपाययोजना करता यावी यासाठी तालुकास्तरीय आदर्श कार्यप्रणाली, नैसर्गिक विषयक आपत्ती निवारण आराखडा आणि गावनिहाय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.
वाहनांची देखभाल
आपत्तीजनक काळात अग्निशामक दल सुसज्ज व अद्ययावत ठेवणे, अग्निशामक कार्यासाठी आवश्यक वाहनांची देखभाल, दुरुस्ती करणेबाबतही या विभागाला सुचना देण्यात आली आहे.
आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य
आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक उपकरणे लाईफ जॅकेट, टायर, दोरखंड, सेप्टी लाईट लॅम्प, माईक-साऊंड व इतर आपत्ती व्यवस्थापनार्थ उपयोगी साहित्य उपलब्ध ठेवण्यात आले असल्याची माहिती नायब तहसीलदार संजय तायडे यांनी दिली.