मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान; प्रशासनाकडून पंचनामे सुरु !

0

यावल/चोपडा/जळगाव: शहर व तालुक्यात काल रविवारी मोठ्या प्रमाणावर वादळासह पाऊस झाला. या वादळामुळे यावल, चोपडा तालुक्यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान या नुकसानबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना माहिती मिळताच त्यांनी या नुकसानीची तातडीने पंचनामा करुन अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांना दिले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी आज सोमवारी महसूल व कृषी विभागाच्या यंत्रणेला जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पंचनामे सुरू करण्यात आले आहेत.

मान्सूनपूर्व पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन आवश्यक ती मदत करण्यात येईल तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असेल त्यांना नियमानुसार भरपाई मिळण्यासाठीचा प्रस्ताव संबंधितांकडे पाठविण्यात येईल, तर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही. मात्र, त्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत भरपाई मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी सांगितले.

रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे अंकलेश्वर – बऱ्हाणपूर राज्यामार्गावर ठिक ठिकाणी झाडे पडली. त्यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती तर कापणी योग्य झालेल्या केळी पिकाचं या वादळात झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे.