मान्सून गोव्यातः राज्यभर मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

0

नवी मुंबई । गेल्या अनेक दिवसांपासून सगळेच जण पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. राज्यामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. आता सर्वांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. काही दिवसांपासून रेंगाळलेला मान्सून अखेरीस गोव्यात दाखल झाला आहे. राज्यात बुधवारी मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर गुरुवारीसुद्धा पाऊस सुरू आहे. मान्सून 8 जून रोजी गोव्यात दाखल होइल, असा अंदाज स्कायमॅटने वर्तवला होता. स्कायमॅटचा हा अंदाज खरा ठरला आहे. 8 जूनचा मुहूर्त साधत मान्सूनने गोव्यात हजेरी लावली आहे. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. मुंबई शहर, उपनगर आणि ठाण्यात काल संध्याकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे नागरिकांना एक सुखद धक्का मिळाला.

मान्सूनपूर्व पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले
मान्सूनपूर्व पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढले. संध्याकाळी काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री पुन्हा जोर धरल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरासह ठाणे आणि नवी मुंबईकरांची तारांबळ उडाली. यंदा मान्सूनने 7 जूनचा मुहूर्त जरी हुकवला असला तरी मान्सूनपूर्व पावसाने 7 जूनला मुंबईत जोरदार हजेरी लावली आहे. मान्सूनपूर्व पावसाने लावलेल्या जोरदार हजेरीमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. मान्सूनच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या महाराष्ट्राला मान्सूनपूर्व पावासाने झोडपायला सुरुवात केली आहे. मुंबईसह अलिबाग, कर्जत, उस्मानाबाद, सटाणा, नांदेडमध्ये मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. गोव्यापर्यंत येऊन ठेपलेल्या मान्सूनची कोकणाच्या दिशेने समाधानकारक वाटचाल सुरू झाली आहे. पुढील 24 तासांत कोकणातील काही भागांत आणि गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होण्याच्या दृष्टीने समाधानकारक परिस्थिती निर्माण झाली आहे.

अनेक ठिकाणी जोरदार पाऊस
पुढील तीन ते चार दिवसात मान्सून संपूर्ण गोवा, अरबी समुद्राच्या मध्येकडील आणखी काही भाग, कर्नाटकचा उर्वरित भाग, कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागातर्फे सांगण्यात आलं आहे. बुधवारी राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. मराठवाडा, कोकणात पावसाचा जोर अधिक होता. पुढील दोन दिवसात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. पुण्यात गुरूवारी काही भागात दुपारी किंवा संध्याकाळपर्यत पावसाची शक्यता आहे.