बोदवड । शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत दहा मापाडी परवानाधारक तोलाईचे काम करतात. हे मापाडी जिनिंगमध्ये गेले असता जिनिंग धारकांनी त्यांना कामास मनाई करत पणन संघाचे परवाने घेतले असल्याचे सांगितले व मापाडी कामगारांना काम करण्यास विरोध केला. या निषेधार्थ मापाडींनी बाजार समितीसमोर ती दिवसांपूर्वी आमरण उपोषण छेडले होते. पुणे पणन संघातील पदाधिकार्यांसोबत बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन कृउबाने दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. उपोषणाची दखल घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
अवैधरित्या हजारो क्विंटल कापसाची खरेदी
मापाडींसंदर्भात बाजार समिती सचिव व सभापती यांनी निर्णय घेऊन योग्य ती कार्यवाई करावी अशी मागणी संघटनेतर्फे करण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासुन अवैधरित्या हजारो किंटल कापसाची खरेदी सुरू असुन सदर प्रकारावर बाजार समितीचे कोणतेही बंधन नसल्याचा आरोप मापाडींनी केला आहे.
गतवर्षाची मापाई रखडली
कृषी उत्पन्न बाजार समितीत परवानाधारक मापाडी यांना तोलाई काम करण्याचा अधिकार आहे शिवाय शासनाने ठरवून दिलेल्या तीन हजार 75 रुपये दराने मापाई देण्यात आली. शासनाकडून मागील वर्षाची 27 हजार 832 क्विंटल तूर खरेदी झाली त्याची अद्यापही मापाई मिळालेली नाही याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. जिनिंग मालकाच्या अरेरावीवर बाजार समितीचे कोणतेही नियंत्रण नाही. त्यामुळे बाजार समिती संचालक सभापती, सचिव जर दखल घेत नसतील तर बाजार समितीला बरखास्त करून कुलूप ठोकण्याची मागणी करण्यात आली. याबाबतचे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी, पणन संचालक- पुणे, विभागीय सहनिबंधक, पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. रमेश गावडे, रामदास वाघ, गोपाळ बडगुजर, रघुनाथ जवरे, अजय पाटील, सुभाष पाटील, विलास काजळे, कैलास वाणी, अजय शेळके, भिकु रेगे आदी 10 मापाडी आमरण उपोषणास बसले आहेत. जिनींग प्रेसिंग युनिट परवाना धारकांकडे मोजमापबाबत पणन संचालक येथे युनियनचे पदाधिकारी व बाजार समितीचे कर्मचार्यांची सोमवार 13 रोजी भेट घेऊन परवान्याविषयी नियमावली व मोजमापाविषयी जो निर्णय दिला जाईल तो मापाडी युनिय व बाजार समितीस मान्य राहिल अशा आशयाचे पत्र बाजार समितीतर्फे देण्यात आले आहे. यावर सचिव काळबैले यांची स्वाक्षरी आहे.
कुटुंबावर कोसळले संकट
उपोषणार्थी मापाडी हे दरवर्षी याच जिनिंगमध्ये कामासाठी जात असतात. हंगाम सुरू झाल्याने ते जिनिंगमध्ये गेले असता त्यांना काम न करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. ऐन हंगामात या मापाडी मजुरांना काम न मिळाल्याने त्यांचा हक्काचा रोजगार हिरावला गेल्याने परीवारावर उपासमारीची वेळ आली होती. या संदर्भात बाजार समिती प्रशासनाने दखल घेतली असलीतरी वरीष्ठ स्तरावर पाठपुरावा करून हक्क परत मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.