माफियावर जलदगतीने कारवाईची केली मागणी

0

नवी मुंबई । घणसोली परिसरात डेब्रीज माफियांनी धुमाकूळ घातला असून, यावर आता अतिक्रमण विभागाला डुलकी लागली आहे की काय, असा सवाल नागरिकांना पडला आहे. यामुळे नागरिकांमध्ये कमालीचा संताप व्यक्त केला जात असून, या डेब्रीज माफियावर जलदगतीने कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. डेब्रीज माफिया यापूर्वी बिनधास्तपणे मोकळ्या भूखंडावर डेब्रीज टाकत होते. परंतु, आता मोकळ्या आडोशाला असणार्‍या भूखंडावर सध्या डेब्रीज माफियांनी डेब्रीज टाकण्याचा सपाटा लावला आहे. घणसोली गावालगत असणार्‍या शेतकरी शिक्षण संस्थेच्या शाळेच्या पाठीमागील वन विभागाच्या जागेवर 400 ते 500 डम्पर टाकले आहेत. ही जागा सध्या पूर्णपणे डेब्रीजने भरली आहे. विशेष या ठिकाणी इतके डम्पर जात असतानाही मनपाच्या अतिक्रमण विभागाला दिसले नाहीत. यावरून डेब्रीज माफिया व मनपा अतिक्रमण विभाग यांच्यात लक्ष्मीदर्शन तर होत नाही ना, अशी शंका नागरिक व्यक्त करत आहेत.

शोध लावण्याची गरज
यापूर्वी सद्गुरू रुग्णालयाच्या पाठीमागील वन विभागाच्या जागेवर डेब्रीज माफिया डेब्रिज टाकत असत. तुलनेने आता डेब्रीज टाकणे कमी झाले असले, तरी आताही डेब्रीज टाकले जात आहे. त्याचबरोबर घणसोली सेक्टर-6 येथील दर्ग्याजवळ असणार्‍या मोकळ्या जागेवर बी. एच. पाटील नावाचे डम्पर याच भूखंडावर कायम उभे असत व याच ठिकाणी डेब्रीज टाकत असल्याचे वास्तव आहे. या डेब्रीज माफियाला कोण सहकार्य करत आहे याचा शोध लावण्याची गरज असल्याची मागणी भाजपचे वॉर्ड अध्यक्ष रवींद्र राजीवडे यांनी केली आहे.

महापालिकेला अपयश
डेब्रीज माफियांना पकडण्यासाठी मनपाने डेब्रीजविरोधी एक टीम कार्यान्वित केली आहे तसेच अतिक्रमण विभागाचीही नजर असणे गरजेचे असताना घणसोली परिसरात बिनधास्तपणे डेब्रीज का टाकला जातो व त्यांना पकडण्यास मनपाला अपयश का येते, असा सवाल एक तरुण अतुल मोहोड यांनी विचारला आहे. याबाबत विभाग अधिकारी नागरे यांना अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.Ÿ