आणखी एक माफीनामा; सिब्बल, गडकरींची मागितली माफी
नवी दिल्ली : विक्रम मजिठिया यांच्या पाठोपाठ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नितीन गडकरी आणि कपिल सिब्बल यांचीही माफी मागितली आहे. या सगळ्यांनी आपल्या विरोधातील अब्रू नुकसानीचा खटला मागे घेण्यासाठी ही माफी त्यांनी मागितली आहे. कपिल सिब्बल यांना पत्र पाठवून केजरीवाल यांनी त्यांची माफी मागितली, तसेच गडकरी यांचीही त्यांनी माफी मागितली आहे. यामुळे सिब्बल, गडकरी हे केजरीवाल यांच्याविरोधातील दावा घेण्याची शक्यता आहे.
बेलगाम आरोपांमुळे माफीनाम्याची नामुष्की
माझ्याकडून काहीही पुराव्यांशिवाय तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले. त्यामुळे तुमची बदनामी झाली हे मी जाणतो. त्याचमुळे तुम्ही माझ्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा ठोकलात. मी केलेल्या आरोपांबाबत मला खेद वाटतो आहे. मी त्यासाठी तुमची माफी मागतो. माझी विनंती आहे की माझ्या विरोधातला अब्रू नुकसानीचा खटला आपण मागे घ्यावा, अशी विनंती अरविंद केजरीवाल यांनी कपिल सिब्बल आणि नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यापूर्वी अरूण जेटली यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केजरीवाल यांनी केले होते. त्यांचीही नंतर केजरीवाल यांनी माफी मागितली होती. अब्रू नुकसानीच्या दाव्यापासून वाचण्यासाठी केजरीवाल यांनी माफीनाम्याचे सत्रच सुरू केले आहे.