आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृती दिन आहे तसेच आजच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीही आहे. या महापुरुषांची स्मृती आळवताना कळत नकळत देशाच्या सद्यःस्थितीचीही जाणीव होते. असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्यांना ओळखले गेले. तेव्हाचा काळ वेगळा होता, ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढण्याचा, जनमत एक करण्याचा तो काळ होता. आज मात्र देशांतर्गत अनेक प्रश्नांनी जनमताला विस्कळीत करण्याची प्रथा पडली आहे. ती सत्ताधार्यांना सोयीस्कर आहे की सर्वसामान्य जनतेला संभ्रमावस्थेत टाकणारी आहे, ते काळच सांगू शकतो. मात्र, देशात कुठेतरी असंतोष माजला आहे, एवढं नक्की. केंद्रात शतप्रतिशत असा नारा देत मोदींचे भाजप सरकार आरूढ झाले. तीन वर्षांचा काळ लोटला त्याला. त्यानंतर मोदी, अमित शहा आणि इतर महान प्रभुतींनी देशातील सर्व राज्यांत आपले स्थान कसे बळकट होईल, याचाच विचार केला.
देश भाजपामय करण्याचे त्यांचे प्रयत्न पक्षपातळीवर स्तुत्य असले तरी तोडा, फोडा आणि राज्य करा, या ब्रिटिश संकल्पनेशीच कुठेतरी त्यांचे लागेबांधे आहेत, असा संशय यावा अशी स्थिती निर्माण झाली आहे. आधी गोवा, मणिपूर आणि आता काल परवा बिहारमध्ये जे झाले, त्याला देशवासी साक्षीदार आहेत. लालूप्रसाद यादव यांच्याशी काडीमोड घेत नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता पुन्हा आपल्या हातात ठेवली. पण यावेळी त्यांचा जोडीदार भाजपा झाला. ही नवी जवळीक होती. तशी ती जुनीच आहे. फक्त मध्ये काही काळाचा खंड पडला इतकंच. जेव्हा संयुक्त आणि राष्ट्रीय जनता दल यांचं संधान होतं, तेव्हा मोदीनंतर नितीशकुमार यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात होतं. आज मात्र खुद्द नितीशकुमार यांनी 2019 मध्ये पुन्हा मोदीच पंतप्रधान होतील, असा ठाम विश्वास जाहीर केला आहे. हेच नितीशकुमार मोदींना काही काळ आधी खलनायक संबोधत होते. पण गेल्या दोन-चार महिन्यांत असं काही राजकारण घडलं की त्यांना हेच मोदी देशाचा मसिहा वाटू लागले. मोदींची हीच खुबी आहे की ते दुश्मनालाही आपलंसं करतात. हा त्यांचा मोठेपणा आहे की बेरकीपणा आहे, ते खुद्द तेच सांगू शकतील. पण तूर्तास, बिहारमध्ये संयुक्त जनता दल आणि भाजप यांचा विवाह झाला असून, पुढील संसार ते नेटकेपणानं करतील, यात काही संशय नाही. एकीकडे लालूंनी या दोन्ही पक्षांना आणि नितीशकुमार व मोदींना कितीही शिव्या घातल्या, शाप दिले तरी काही फरक पडत नाही. कारण, सध्या लालूंचे हात-पाय दगडाखाली आले आहेत. त्यांचा चारा घोटाळा, रेल्वे घोटाळा, मुलाने केलेले प्रताप त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहेत. ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला आहे.
काँग्रेसपेक्षा भाजपकडे धूर्त आणि वेळीच उत्तम राजकारण करणारी मंडळी जास्त आहेत. त्यामुळेच राष्ट्रपतिपदावर भाजपनं रामनाथ कोविंद यांना विराजमान केलं, उपराष्ट्रपतिपदावर व्यंकय्या नायडू गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच आहेत. सध्या देशाच्या सर्वोच्च अशा सगळ्या पदांवर भाजपचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते विराजमान आहेत. ही खेळी फक्त भाजपच करू जाणते. एवढं राजकारण ना अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं, ना लालकृष्ण अडवाणी यांनी केलं. सध्याचा काळ हा मोदी, शहा यांच्या राजकारणाचा आहे. त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या विचारांची पुन्हा आठवण होते. त्यांनी ज्या उद्देशानं जनमत एक करण्यासाठी चळवळ उभारली होती, ती पाहता आजच्या या वळवळींनी त्यावर सपशेल मात केली आहे. भ्रष्टाचार संपवणं हा परवलीचा शब्द घेऊन मोदींनी 2014 मध्ये देशात भाजपची सत्ता आणली. गेल्या तीन वर्षांत अनेक राज्यांत जुने सत्ताधीश अस्ताला गेले आणि नवे सत्ताधीश उगवले. थोड्याबहुत फरकानं गैर भाजप सरकारे पडली, कोसळली, काँग्रेस देशोधडीला लागली आणि नवी सत्तासमीकरणे अस्तित्वात आली. बिहारमध्ये तर तमाशाच झाला. भाजपसोबत नितीशकुमार यांचं सूत याहीआधी जुळलं होतं. पण, त्यांचा 17 वर्षांचा संसार तुटला होता. लालूप्रसाद यादवांनी पुन्हा भरारी मारून सत्तेत स्थान मिळवलं होतं. त्यानंतर पुन्हा माशी शिंकली. कारणं काहीही असोत, पण हे गठबंधन तुटलं. तेजस्वी यादवांचा भ्रष्टाचार हा वादाचा मुद्दा झाला आणि तेवढंच सूत गाठून सत्तेचा स्वर्ग मिळवण्याचं कसब भाजपनं साधलं. या सगळ्या गदारोळात काँग्रेस तर पार हादरून गेली. असो, जे झालं ते सत्य आहे. यावरून शेंगा कोणी आणल्या आणि टरफलं कोणी वेचली, हा ऐतिहासिक प्रश्न आता कोणी विचारणार नाही. स्वार्थ आहे तो एवढाच की शेंगा कोणाकोणाच्या तोंडात गेल्या आणि कोणी कोणी त्या पचवल्या. गीता रहस्य लिहिणार्या लोकमान्यांनाही आता तो प्रश्न पडला असता. इतकं आजचं राजकारण विदारक झालं आहे. आजच अमित शहा म्हणाले की, लालूंना पुन्हा नितीशकुमार यांच्याशी संसार करायचा असेल तर काय आम्ही नितीशकुमार यांच्यावर बंदुकीनं गोळ्या झाडायच्या का? म्हणजे आजचं राजकारण केवढ्या थराला गेलं आहे, याचा विचार केला तरी पुरे आहे. दुसरीकडे संयुक्त जनता दलाचे माजी अध्यक्ष शरद यादव यांना नितीशकुमार यांचं वागणं पटलेलं नाही. पण आता बहुमतात आलेल्या नितीशकुमार यांच्या विद्यमान पक्षाला व त्यांचे सहकारी भाजपला शरद यादव यांनाही महत्त्व देण्याचं कारण नाही. कारण, त्यांना आता किमान 2019 पर्यंत सत्ता मिळालेली आहे. यापुढेही त्यांचंच राज्य कायम राहील, असं राजकारण येत्या दोन वर्षांत केलं जाईल.
कदाचित भाजप येत्या दोन वर्षांत नितीशकुमार यांना बाजूला करून सत्ताधारी होईल. आपल्या महाराष्ट्रातही भाजप ही शिवसेनेला शह देऊन एकहाती सत्ता काबीज करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. थोडक्यात काय, तर एकसंध देशासाठी लोकमान्यांनी केलेल्या कार्याची भाजपनं अशा पद्धतीनं अनुकरण करण्याची रीत अनुभवली आहे, असं म्हणावं लागेल. एकंदरीत, आज लोकमान्यांना अभिवादन करताना, लोकमान्य माफ करा… असं बोलावंसं वाटतं. आता लोकमान्यांनी कोणाला माफ करायचं ते त्यांना ठरवू द्यावे!