मामणोली गावाजवळ टेम्पोची एसटीला धडक

0

कल्याण : मुरबाडला जाणार्या टेम्पोने मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजण्याच्या सुमारास एसटीला धडक दिल्याची घटना घडली. हा अपघात कल्याण तालुक्यातील मामणोली गावाजवळ घडला असून या अपघातात एक प्रवासी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कल्याण एसटी आगारातून मंगळवारी पहाटे सव्वापाच वाजता बस क्रमांक एमएच 20, इएफ 6089 ही कल्याण – मुरबाड एसटी मुरबाडच्या दिशेने रवाना झाली. या बसमध्ये 19 प्रवाशी होते. कल्याण- मुरबाड एसटी बस मामणोली गावापासून मुरबाडकडे जात असताना अचानक समोरून येणार्या टेम्पो क्र.एम.एच. 48 ऐ-जी 5790 याने बसला डायव्हर बाजूकडे जोरात धडक देऊन पळून गेला. एसटी डायव्हर अशोक अधिनाथ दहिफळे यांनी प्रसंगावधान दाखवत बस रस्त्याच्या खाली उतरवली. यामुळे प्रवाशांचा जीव वाचला. परंतु यामध्ये सोमनाथ बाबुराव मडके (30 रा. शंकरनगर, नांदेड) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना प्रथम गोवेली ग्रामीण रुग्णालयात उपचार करून कल्याण येथील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तसेच चालक दहिफळे यांच्या डोक्याला व हाताला मार लागला आहे. या संदर्भात कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे