मामाजी टॉकीज रस्ता बंदमुळे एसटीची दहा रुपये भाडेवाढ

0

भुसावळ- शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याच्या ट्रीमिक्स काँक्रीटीकरण डागडूजीसाठी या रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे यावल, फैजपूर, सावदा व रावेरकडे जाणाऱ्या बसेस नाहाटा चौफुली, महामार्ग,नवोद्य विद्यालय मार्गाने जात असल्याने सहा किलोमिटरचा फेरा वाढून दहा रुपये भाडेवाढ करण्यात आली आहे.  शहरातील मामाजी टॉकीज रस्त्याच्या डागडूजीसाठी पालिकेने दगडी पूल ते स्व. नाटकर चौकापर्यंतचा रस्ता वाहतूकीसाठी बंद ठेवला आहे. यामुळे आता भुसावळ बस आगारातून यावल, रावेर, सावदा व फैजपूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस नाहाटा महाविद्यालय, महामार्ग, नवोद्य विद्यालय, जळगावरोड गांधीपुतळयामार्ग जात आहेत. यामुळे एसटीला तब्बल सहा ते साडेसहा किलोमिटरचा फेरा वाढल्याने एसटीच्या भाड्यातही १० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यावल , फैजपूर, सावदा, रावेर येथून शहरातील गांधीपुतळ्यापर्यंत पूर्वीचे भाडे आहे तर बसस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांना अतिरिक्त दहा रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. तर या भागात शहरात येणाऱ्या मिनिडोअर, अॅपेरिक्षा मात्र गांधीपुतळ्यापासून सरळ तापीरोडाने शहरातील बसस्थानकापर्यंत जात असल्याने या प्रवाशी वाहतूकीचे दर पूर्वीप्रमाणे ठेवण्यात आले आहे. एसटी महामंडळाने केलेल्या दरवाढीबद्दल प्रवाशांनी तिव्र संताप व्यक्त करीत पूर्वीचे भाडे कायम ठेवण्याची मागणी केली आहे.