मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा पैलवान गणेश हिरगुडे ‘देहूरोड केसरी’

0

देहूरोड। शिवस्मारक समिती, शिवजयंती महोत्सव समिती आणि श्री छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान यांच्यावतीने देहूरोड येथे शिवजयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कुस्त्यांच्या जंगी सामन्याने या सोहळ्याची सांगता झाली. मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलाचा गणेश हिरगुडे याने सोन्या सोनटक्के याच्यावर मात करून देहूरोड केसरी हा किताब तसेच चांदीची गदा, रोख 25 हजाराचे बक्षीस पटकावले. देहूरोड येथे शिवजयंतीनिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा भरविण्यात आला होता. देहूरोड रेल्वेस्थानकाजवळ किवळे विविध कार्यकारी सोसायटीच्या मैदानात लाल मातीच्या अअखाड्यावर या कुस्त्या पार पडल्या.

रोमहर्षक लढत
अंतिम लढत सोमाटणेच्या गुरूकुल कुस्ती संकुलाचा सोन्या सोनटक्के आणि मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलचा गणेश हिरगुडे यांच्यात झाली. अत्यंत चुरशीच्या या सामन्यात क्षणाक्षणाला उत्कंठा ताणली जात होती. अत्यंत रोमहर्षक झालेल्या या सामन्यात हिरगुडे याने आपली पकड सुरूवातीपासूनच मजबूत ठेवली होती. त्याला सोन्या सोनटक्केकडुन कडवी झूंज दिली जात होती. सुमारे 45 मिनीटांनंतर हिरगुडेने सोनटक्के याला चितपट केले. आयोजक लहूमामा शेलार, अ‍ॅड. कृष्णा दाभोळे, सुर्यकांत सुर्वे, ललित बालघरे, विशाल खंडेलवाल, रघुवीर शेलार, अमोल नाईकनवरे, गणेश कोळी, बाळासाहेब झंजाड, संजय पिंजण, रमेश जाधव, कैलास गोरवे, बाळासाहेब फाले, यदुनाथ डाखोरे, मिकी कोचर, संजय माळी, हिरामण साळुंखे, पोपट कुरणे, बाबु कोरे, शिवाजी दाभोळे, रेण्णु रेड्डी, किशोर जगताप, दिलीप शिंदे, दत्तात्रय राऊत, दत्तात्रय तरस आदींच्या उपस्थितीत बक्षीस देण्यात आले.

35 कुस्त्या संपन्न
या आखाड्यात विविध वजनी गटातील सुमारे 35 कुस्त्या झाल्या. त्यातील जवळपास सर्वच कुस्त्या निकाली झाल्या. स्व. पै. शांतारामशेठ माळी यांच्या नावाने भव्य मैदान तयार करण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू व सोमाटणे येथील गुरूकुल कुस्ती संकुलाचे संचालक पैलवान शंकर कंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्त्यांचे सामने झाले. शिवस्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय तरस यांच्याहस्ते आखाडा पूजन झाले. शंकर कंधारे, मोहन खोपडे, संजय दाभाडे, अमित पिंगळे, खंडू वाळूंज यांनी पंच म्हणून कामकाज पाहिले.