बंदुकीच्या गोळीने जळगावातील माहेरवाशीन विवाहितेचा मृत्यू

0

जळगाव-  गडचिरोली जिल्ह्यात मुलचेरा येथे कार्यरत पोलीस उपनिरिक्षक धनराज बाबुलाल शिरसाठ वय 34 रा. मूळ रा. मुसळी ता.धरणगाव यांची पत्नी व जळगावातील माहेरवाशीन संगीता शिरसाठ हिचा बंदुकीच्या गोळीने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास घडली. पोलीस उपनिरिक्षक पती धनराज शिरसाठ याने संगीतावर गोळी झाडल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप संगीताचा भाऊ गणेश सपके याने केला आहे. संगीताने स्वतः गोळी झाडून आत्महत्या केल्याची चर्चा असून त्याबाबत खुलासा होवू शकला नाही. पोलीस अधिक तपास करीत आहे. दरम्यान घटनेनंतर संगीता हिची सात वर्षीय मुलगी भार्गवी हिने मम्मीला गोळी लागून तिचा मृत्यू झाल्याचे तिचे मामा गणेश सपके यांना मोबाईलवरुन कळविल्यानंतर प्रकार समोर आला.

मुसळी येथील पोलीस उपनिरिक्षक, मुलचेरा येथे कार्यरत

संगीता यांचा भाऊ गणेश सपके यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते शहरातील लक्ष्मीनगरात राहतात. सात वर्षापूर्वी बहीण संगीताचा विवाह धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील धनराज शिरसाठ यांच्याशी झाला. त्यांना सात वर्षाची मुलगी भार्गवी व चार वर्षाचा मुलगा शिवा, अशी दोन मुले आहेत. धनराज शिरसाठ हे मुंबई येथे पोलीस हवालदार होते. 2017 मध्ये त्यांनी पोलीस उपनिरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांना पोलीस उपनिरीक्षकपदी पहिलीच नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात मिळाली. त्यानुसार पत्नी व मुलासह ते मुलचेरा येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास आहेत.

वर्षभरापासून पती-पत्नीमध्ये कौटुंबिक वाद

वर्षभरापासून धनराज व संगीता यांच्या वाद सुरु आहे. नियमित होत असलेल्या वाद व त्यामुळे होत असलेल्या त्रासाबद्दल संगीता हिने जळगावात राहत असलेल्या आपल्या वडीलांना माहिती दिली. त्यानुसार वडीलांनी धनराज याच्या आई तसेच वडीलांना मुलगा धनराज याची समजूत काढण्याचे सांगितले होते. याप्रमाणे समजुत काढण्यासाठी लॉकडाऊनपूर्वी धनराज याचे वडील बाबुलाल नामदेव शिरसाठ व आई सुशीला शिरसाठ हे मुलचेरा येथे गेले होते. यादरम्यान गुरुवारी 7 मे रोजी दुपारी धनराज व पत्नी संगीता यांच्यात भांडण झाले. या भांडणातून धनराज याने त्याच्याजवळ असलेल्या रिव्हॉल्वरने पत्नी संगीतावर गोळी झाडली. यात एक गोळी संगीताच्या डोक्यात शिरली, तर दुसरी गोळी कानाला चाटून गेली. या प्रकारानंतर घटनेची प्रत्यक्षदर्शी असलेली संगीताची मुलगी भार्गवी हिने तिचे जळगावातील मामाला तसेच बाबा यांना मोबाईलवरुन संपर्क साधला. यानंतर घटनेची माहिती मिळाली, असे संगीताचा भाऊ गणेश सपके याने सांंगितले.

माहेरची मंडळी मुलचेराकडे रवाना

या घटनेची माहिती मिळाल्यावर जळगावातील माहेरची मंडळींनी त्यांचे मूलचेरा येथील नातेवाईकांना घरी जावून माहिती घेण्यास सांगितले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन असल्याने थेट जाता येणार नाही. त्यासाठी नियमानुसार पासची आवश्यकता आहे. त्यानुसार संगीता हिचे माहेरची मंडळी संबंधित शासकीय कार्यालयात जावून मुलचेरा येथे जाण्यासाठी आवश्यक पास तयार करण्याचे काम करत होते. शेवटची वृत्त मिळाले तोवर पासेस तसेच परवानगी मिळाल्यानंतर संगीताचे कुटुंबीय मुलचेराकडे रवाना होणार आहेत.