मामुर्डी येथे एकावर वार; अद्याप गुन्हा दाखल नाही

0

देहूरोड : मामुर्डी येथे एकावर धारदार शस्त्राने वार झाल्याचा प्रकार गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिसांना शहरातील एका खासगी रुग्णालयातून खबर प्राप्त झाली. मात्र, या प्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल नव्हता. अनिल कचरू राऊत (अंदाजे वय 40, रा. मामुर्डी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

निवडणुकीची खुमखुमी
रात्री दीडच्या सुमारास मामुर्डीजवळ सिध्दार्थनगर येथे काही तरुणांशी त्याचा वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत होऊन काहीजणांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र, स्थानिक पोलिस ठाण्यात केवळ रुग्णालयाकडून मिळालेली खबर प्राप्त असल्याचे सांगण्यात आले. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत या भागातून पराभूत उमेदवाराकडून सिध्दार्थनगर येथील तरुणांनी पैसे घेतले होते. मात्र, याभागातून मतदान न झाल्यामुळे किरकोळ मतांच्या फरकाने संबंधित उमेदवार पराभूत झाला होता. त्यावरुन राऊत आणि या भागातील तरुणांमध्ये सतत भांडणे होत असल्याची माहिती माहितगार सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांकडून मात्र, त्याला दुजोरा मिळू शकला नाही.