मायमर मेडिकल कॉलेजचे बेकायदा बांधकाम

0

नगरसेवक अरुण माने यांनी केली तक्रार

तळेगाव दाभाडे : येथील मायमर मेडिकल कॉलेजने बिगर परवाना बेकायदा बांधकाम केल्याची तक्रार तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक, माहिती अधिकार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अरुण माने यांनी केली आहे. याबाबत नगर परिषदेने त्वरित कारवाई न केल्यास न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशारा दिला आहे. माने यांनी सतत पाठपुरावा केल्याने तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी संबधित बिट अधिकार्‍यांमार्फत तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये नुकतीच तक्रार दाखल केली आहे. आता तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि पोलीस यंत्रणा यांचे कडून दिरंगाई झाल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ते जमीर नालबंद, किरण साळवे, सुर्यकांत बोराडे उपस्थित होते.

नगर परिषदेची धीम्यागतीने कारवाई

माहिती अधिकार मंचाचे संस्थापक अध्यक्ष अरुण माने यांनी येथील सर्व्हे नंबर 32,33 तळेगाव जनरल हॉस्पिटल परिसरातील मायमर मेडिकल कॉलेज या संस्थेने तळेगाव नगर परिषदेची कोणतीही बांधकामाची मंजुरी न घेता बेकायदा बांधकामे केलेली आहे. याबाबत नगर परिषदेकडे माने यांनी 2015 रोजी तक्रार केली होती. मात्र नगरपरिषदेने अत्यंत धीम्यागतीने 2017 मध्ये संचालकांना बेकायदेशीर विनापरवाना काम केले असून ते त्वरित काढून टाकावे अशी नोटीस बजावली होती. मात्र याबाबत संबधितांनी कोणतीही दखल न घेतल्याने माने यांनी जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे तक्रार केली आहे.