मायावतींचा राजीनामा स्वीकारला

0

नवी दिल्ली : एनडीए सरकारच्या काळात दलितांवर होणार्‍या अत्याचारांविरोधात राज्यसभेत बोलू दिले जात नसल्याचा आरोप करत मंगळवारी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी राज्यसभा सदस्यत्त्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. मायावती यांचा हा राजीनामा गुरूवारी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी स्वीकारला.

असे घडले राजीनामा नाट्य
सभागृहात उत्तर प्रदेशातील दलितांवरील अत्याचाराचा मुद्दा मायावती राज्यसभेत उपस्थित करु पाहत होत्या. मात्र, त्यांच्या मनानुसार त्यांना बोलण्यासाठी संधी दिली गेली नाही. भाजप देशभरात जातीयवाद पसरवत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावेळी मायावतींनी माफी मागावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. मला सभागृहात बोलू दिले नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन, असा इशारा मायावतींनी दिला होता. मात्र, त्यानंतरही भाजपचे खासदार ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे मायावती यांनी सभात्याग केला होता. त्याच दिवशी संध्याकाळी मायावती यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा तडकाफडकी राजीनामा दिला. राज्यसभा सभापतींच्या कार्यालयात राजीनामा देण्यासाठी जात असताना मायावती यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद, काँग्रेसचे राज्यसभा सदस्य राजीव शुक्ला, खासदार सतीशचंद्र मिश्रा यांनी सभापतींचे कार्यालय गाठून मायावती यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, आपल्या निर्णयावर ठाम राहत मायावती यांनी सभापतींकडे राजीनामा सुपुर्द केला होता. हा राजीनामा उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी गुरूवारी स्वीकारला.

हा राजकीय डाव असल्याची चर्चा
मायावतींच्या राजीनाम्यानंतर अनेक राजकीय अर्थही काढले गेले. मायावतींनी मोठ्या विचारपूर्वक हे केले असून, पुढील वाटचालीसाठी त्यांनी खेळलेला हा राजकीय डाव आहे अशी चर्चाही रंगली होती. उत्तर प्रदेशमधील फुलपूर लोकसभा मतदारसंघातून त्या निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केशवप्रसाद मौर्य हे फुलपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. परंतु, त्यांचा उत्तर प्रदेशच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, राज्याचे ते उपमुख्यमंत्रीही आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देऊन विधानसभा किंवा विधानपरिषदेवर निवडून यावे लागणार आहे. त्यामुळे फुलपूर लोकसभा मतदारसंघातून मायावती निवडणुकीसाठी उभ्या राहू शकतात. बसपसाठी ही जागा खूप महत्वाची आहे.