नवी दिल्ली :काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यापाठोपाठ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बहुजन समाज पार्टीच्या सर्वेसर्वा मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांच्यासह ३ हजार बड्या लोकांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं आहे. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे नेते, सामाजिक कार्यकर्ते, निवृत्त सरकारी अधिकारी आणि धार्मिक नेत्यांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे मायावती आणि अखिलेश यादव संघाचं निमंत्रण स्वीकारतात का? याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
येत्या १७ ते १९ सप्टेंबर दरम्यान दिल्लीतील विज्ञान भवनात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या तीन दिवसीय शिबिरात ‘भविष्यातील भारत: संघाचा दृष्टीकोण’ या विषयावर मंथन होणार आहे. या कार्यक्रमासाठी संघाने राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, अखिलेश यादव, मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासह विविध क्षेत्रातील तीन हजार नामवंतांनाही निमंत्रण दिलं आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाला ८०० ते १००० लोक उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.