लखनौ- उत्तर प्रदेशमधील स्मारक घोटाळ्याप्रकरणी बसपा प्रमुख मायावती यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने या घोटाळ्याप्रकरणी आज गुरुवारी सहा ठिकाणी छापा टाकला आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापले आहे.
उत्तर प्रदेशमध्ये मायावती मुख्यमंत्रीपदी असताना स्मारके आणि उद्याने उभारताना आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. राज्यात विविध स्मारके स्मृतिउद्याने उभारण्यासाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदींच्या ३४ टक्के म्हणजे तब्बल १,४०० कोटी रुपयांचा हा आर्थिक घोटाळा असल्याचा ठपका २०१३ मध्ये लोकायुक्तांनी ठेवला होता. याप्रकरणी, १९ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली तसेच भारतीय दंडविधान कायद्याच्या कलम ४०९ अन्वये प्राथमिक आरोपपत्र दाखल करण्याची शिफारस लोकायुक्तांनी केली होती.
या प्रकरणाचा ईडीकडून तपास सुरु आहे. या प्रकरणात आज गुरुवारी ईडीने उत्तर प्रदेशमध्ये सहा ठिकाणी छापा टाकला. या कारवाईवर बसपाकडून प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. मात्र, या कारवाईमुळे उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी सीबीआयने अखिलेश यादव यांच्यावरही कारवाई केली होती. अवैध खाणकामाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या कार्यकाळात मुख्यमंत्री कार्यालयाने एकाच दिवशी १३ खाणकाम प्रकल्पांना मंजुरी दिली आणि यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. ईडीनेही याप्रकरणी अखिलेश यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता.