माय-लेकींची निर्घृण हत्या : धुळे जिल्ह्यात खळबळ
तरवाडे शिवारातील घटना : धुळे तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा
धुळे : अल्पोपहाराचे हॉटेल चालवणार्या माय-लेकींचा डोक्यात धारदार शस्त्र टाकून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास तरवाडे शिवारात घडली. या घटनेने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. हत्येचे मात्र नेमके कारण समोर आलेले नाही. चंद्रभागा भावराव महाजन (65, रा.तरवाडे, ता.धुळे) व वंदनाबाई गुणवंत महाले (45, रा.कासोदा, आडगाव ता.एरंडोल) अशी मृतांची नावे आहेत. काही संशयीतांची धुळे तालुका पोलिसांनी खून प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
खाटेवरच केली माय-लेकींची हत्या
धुळे तालुक्यातील तरवाडे गावात राहणार्या चंद्रभागा भाऊराव महाजन (65) यांना दोन मुले आणि एक मुलगी आहे. चंद्रभागाबाई या मुलांपासून विभक्त राहत होत्या व त्यांनी तरवाडे शिवारातील धुळे-सोलापूर मार्गावर एका पत्री शेडमध्ये अल्पोपहाराची हॉटेल टाकून उदरनिर्वाह सुरू केला होता. त्यांची मुलगी वंदनाबाई गुणवंत महाले (45) ही आडगावस्थित मुलगी कौटुंबिक कारणामुळे आईजवळच तीन महिन्यांपासून वास्तव्यास होती. सोमवारी सकाळी चंद्रभागाबाई यांचा नातू दूध घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला असता त्यांना या दोघींचा मृतदेह खाटेवर रक्ताच्या थारोळ्यात दिसून आल्यानंतर घटना उघडकीस आली.
पोलिस अधिकार्यांची धाव
धुळ्याचे अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, उपनिरीक्षक सागर काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे हेमंत पाटील, प्रकाश पाटील यांच्यासह श्वान पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. दोघाही महिलांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केल्याची बाब निदर्शनास आली तर श्वान पथकाला मारेकर्यांचा माग काढता आला नाही. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभागाबाई यांच्या मुलाने काही संशयीतांची नावे तालुका पोलिसांना सांगितल्यानुसार संशयीतांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.