मारवड येथे पशुवैद्यकीय अधिकारी नेमण्याची मागणी

0

अमळनेर । तालुक्यातील मारवड येथे पशुवैद्यकिय अधिकारी नसल्याने गुरा ढोराच्या आरोग्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. मारवड येथे श्रेणी- 1 पशुवैद्यकीय दवाखान्यात गेल्या अनेक दिवसांपासून पशुवैद्यकीय अधिकारी पदाची जागा रिक्त असल्याने नविन पशुवैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती व्हावी अशी मागणी पशुपालकांमधुन होत आहे. पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त असल्याने पशुपालकाचे हाल होत आहे.

तालुक्यात अमळनेर, अमळगाव, पातोंडा, वावडे, मारवड़ , कळमसरे या सहा ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी-1 चे आहेत. त्यात मारवड व वावडे या दोन्ही गावातील पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुवैद्यकीय अधिकारी पद रिक्त आहेत. मालपुर, ढेकु, जानवे, पिंपळे या ठिकाणी श्रेणी-2 दवाखाने आहेत. एका दवाखान्याला शेजारील दहा ते बारा गावे जोडली गेले आहेत. मारवड वावडे याठिकाणी अतिरिक्त भार देण्यात आला. यापैकी कळमसरे येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. इंगोले यांना मारवड येथील अतिरिक्त पदभार दिल्याने कामाचा बोजवारा वाढला आहे. त्यात ते आठवड्यात पाच दिवस कळमसरे व दोन दिवस मारवडला भेट देतात मात्र रोज याकडे लक्ष्य घालून कायम स्वरूपी पशुवैद्यकीय अधिकार्याची नेमणूक व्हावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. एका पशुवैद्यकीय दवाखान्या अंतर्गत दहा ते बारा गावांचा भार देऊन ही तालुक्यात प्रथम श्रेणीचे सहा दवाखाने असताना त्यातील दोन ठिकाणी पद रिक्त असल्याने यावरून शासनाचा निष्काळजी पणाचे चित्र स्पष्ट होत असल्याचे सुर ग्रामस्थांमध्ये उमटत आहे.