‘मारवाडी’ घोड्यांच्या गतवैभवासाठी प्रयत्न!

0

शिरगाव । इंडिजिनीअस हॉर्स ओनर्स असोसिएशनयांच्या वतीने सोमाटणे येथे जोपिलोपी स्टुड फार्म येथे मारवाडी जातीच्या घोड्यांचे भव्य असे प्रदर्शन भरवण्यात आले होते. हे प्रदर्शन 17 ते 19 मार्च दरम्यान चालले यात 100 पेक्षा जास्त मारवाडी घोड्यांचा मालकांनी आपल्या घोड्याचा सहभाग नोंदवला होता. प्रदर्शनाचे उद्घाटन सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाचे संस्थापक सदस्य जयपाल सिंह रावल यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाचे हे दुसरे वर्ष असून यावेळी मागील वर्षी पेक्षा मोठ्या प्रमाणावरील घोड्यांच्या प्रजाती, फार्म मालक आणि अश्वप्रेमीनी हजेरी लावली होती. शुरवीरांच्या या भूमीतील या मूळ प्रजातीचे लोप पावलेले वैभव पुन्हा मिळवून देण्याचे उद्दिष्ट या प्रदर्शनामागे होते. तीन दिवसात येथे साधारणपणे 3500 ते 4000 अश्वप्रेमिनी भेट दिली.

100 पूर्णपणे मारवाडी प्रजातीच्या घोड्यांचा समावेश
या प्रदर्शनात राजस्थान, गुजरात, हिमाचल, आसाम, उत्तर प्रदेश आदी राज्यातून मारवाडी जातीच्या घोड्यांचा सहभाग होता. देशभरातील सुमारे 100 पूर्णपणे मारवाडी प्रजातीच्या घोड्यांनी या कार्यक्रमातील उपस्थितांना आपली स्वभाव वैशिष्ट्ये आणि रुबाबदार चालीचे दर्शन घडवले. घोड्याच्या प्रजातींमध्ये अभिजातता, ताकद आणि डामडौलासाठी ओळखल्या जाणार्‍या मारवाडी प्रजातीची भव्यता पुन्हा एकदा लोकांसमोर आणणे या जातीचे मोठ्या प्रमाणावर संवर्धन होणे हा विचार यंदाच्या प्रदर्शनामागे होता.

विजयी घोड्यांची विभागवार यादी
मिल्क टीथ फिली विभागात – सल्तनुशशेख अफझल, सिमरनशेख अफझल, वनाया प्रितम पाटील. मिल्क टीथ कोल्ट ः धनुश जुगनी गांधी, दिलखुश भूषण नाना देवरे, बाहुबली रोहित सिंग पाटील. टू टिथ फिली : माया राहुल बोराडे, कावेरी नितीन वरपे, मस्तानी मयूर धवनटू. टिथ कोल्ट ः ऑस्कर राज सातपुते, लंकेश जुगनू गांधी, मल्हार सुधाकर. मापरे मेअर्स : शेझादी मन्सूर अली खान, अदिवा अजय नॅन्स, काजल सचिन. झेलेस्टेलिअन्स ः दिलशेर मन्सूर अली खान, युवराज रणजित नगरकर, मेघनाथ जिनी विजयी ठरले.

घोड्यांच्या मालकांना एक व्यासपीठ उपलब्ध
इंडिजिनीअस हॉर्स ओनर्स असोसिएशनचे सचिव अजय नेन्सी म्हणाले, ‘मारवाडी प्रजातीच्या घोड्यांप्रमाणेच इतर भारतीय प्रजातीच्या घोड्यांच्या मालकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशााने काही वर्षांपूर्वी या संस्थेची स्थापना करण्यात आली. रणजित पवार, धवलसिंह मोहिते पाटील आणि धीरज देशमुख यांनी सहकार्य केले. पुन्हा एकदा नव्याने महत्त्व मिळू लागलेल्या घोड्यांच्या स्थानिक प्रजातींना प्रोत्साहन देणे आणि त्यासाठी मालकांना एकत्र येऊन एकमेकांसोबत संपर्क जाळे तयार करता यावे, हा विचार यामागे आहे.

क्रीडा क्षेत्र व नवी पिढी घडविण्यासाठी

रचनेतील दर्जा आणि प्रत्येक घोड्याची हालचाल यांचे परीक्षण करणे हे उद्दिष्ट आहे. याच गुणांवरून हे घोडे भविष्यात क्रीडा क्षेत्रासाठी योग्य असतील की घोड्यांची नवी पिढी घडवण्यासाठी त्यांचा उपयोग केला जाईल, हे ठरते. व्यावसायिक आणि ब्रीडर्ससाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्याकडील तरुण घोड्यांचे खूर आणि इतर वैशिष्ट्यांवरून त्यांची योग्यता तपासण्याची संधी देणारे व्यासपीठ उपलब्ध होते. मारवाडी घोड्यांचे लुप्त झालेले वैभव परत मिळवून देण्याचा आणि अधिकाधिक ब्रीडर्स आणि तबेल्याच्या मालकांना प्रोत्साहन देऊन या प्रजातींना पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून करण्यात आला. जर असे प्रदर्शन संपूर्ण भारतभर वरचेवर होत राहिले तर आज लोप पावत चाललेली ही मारवाडी घोड्याची जात बचावली जाईल आणि या जातीचे संवर्धन होईल असा विश्वास जोपिलोपी स्टुड फार्मचे मालक रोहन मोरे यांनी यावेळी व्यक्त केला.