जळगाव : बांधकाम व्यवसायिक खुबचंद साहित्या यांना गोरजाबाई जिमखान्यात झालेल्या मारहाणीप्रकरणी चौघे संशयित पोलिसांना शरण आले आहेत. दरम्यान,चौघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित माजी महापौर ललित कोल्हे हे अद्याप बेपत्ता आहेत.
शहरातील बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांच्या नावावर असलेली महागडी चारचाकी माजी महापौर ललित कोल्हे घेऊन गेले आहेत. ही चारचाकी परत मागीतल्यावरुन वाद सुरू झाले. यातूनच कोल्हे यांच्यासह सात जणांनी साहित्यांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी साहित्या यांच्या फिर्यादीवरुन शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील मुख्य संशयित कोल्हे हे अद्याप बेपत्ता आहेत. तर दोन दिवसात बुधवारी गणेश अशोक बाविस्कर (वय 25, रा.तुरखेडा, ता.जळगाव) व नरेंद्र चंदू अग्रिया (वय 24, रा.वाघनगर) तसेच राकेश अग्रिया व निलेश पाटील असे चार जण पोलिसांना शरण आले आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.