शहादा:येथील एका नगरसेवकाने आपल्या कार्यकर्त्यांसह ठेकेदाराच्या मेव्हुण्यास निकृष्ट काम होत असल्यावरुन मारहाण केली. या मारहाणीच्या निषेधार्थ संबंधित ठेकेदाराने काम बंद केले असून मारहाणी मागील कारण गुलदस्त्यात असले तरी याची उलट सुलट चर्चा मात्र शहरभर रंगली आहे.
शहरातील नऊ प्रभागात नगरोत्थान योजने अंतर्गत दहा लाख रुपयांचे रस्ता काँक्रीटीकरणाचे काम मंजूर होवून कामास सुरुवात करण्यात आली. हे काम निकृष्ट होत असल्याची आवई ह्या प्रभागातील सत्ताधारी गटातील एका नगरसेवकाने उठवत तसा जाब ठेकेदारास विचारला गेला. परंतु दोघांचा वाद विकोपाला जावून नगरसेवक आणि त्याच्या कार्यकर्त्यांनी ठेकेदाराच्या मेव्हुण्यास मारहाण केली.काहींच्या मध्यस्तीने प्रकरण सामोपचाराने मिटविण्यात येवून पोलीसांपासून लांब ठेवण्यात आले.
या प्रकरणाची चर्चा मात्र शहरभर रंगली. तसेच मारहाण झाल्याने संबंधित ठेकेदाराने त्या कामाला ब्रेक लावीत आपले बिड्यार बंद केले आहे. रस्त्याचे काम अपूर्णावस्थेत राहिल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी आता पालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी मारहाणी मागील कारणाची चर्चा रंगू लागली आहे.