तळोदा : तळोदा शहरातील एका लग्नात नाचताना धक्का लागल्यावरून झालेल्या वादात तरुणाला बेदम मारहाण झाल्याने तरुणाचा मृत्यू ओढवला. या घटनेप्रकरणी चौघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयीतांना अटक करण्यात आली.
नाचताना धक्का लागल्याने युवकाचा मारहाणीत मृत्यू
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका हाटीत शुक्रवारी लग्नाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात संदीप सुनील पाडवी (18, रा.कोहली हटी) हादेखील नाचत होता. नाचताना त्यास धक्का लागल्याने लव सोना पाडवी, कुश सोना पाडवी, सूरज रवींद्र पाडवी, रोहित रवी पाडवी (सर्व रा.पाडवी गल्ली) यांनी संदीप यास बेदम मारहाण केली. अत्यवस्थ अवस्थेत संदीप पाडवी यास उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असत.ा उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.
चौघांविरोधात खुनाचा गुन्हा
या प्रकरणी विजयसिंग पाडवी यांच्या फिर्यादीवरून चारही आरोपींविरोधात खुनाच्या गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अविनाश केदार करीत आहेत. पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली. खूनाच्या घटनेची माहिती मिळताच अक्कलकुवा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी संभाजी सावंत व पोलिस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी घटनास्थळी भेट देत माहिती जाणली.