जळगाव – जामनेर तालुक्यातील कापुसवाडी येथे जागेच्या वादावरून गैरकायद्याची मंडळी जमवून तरुणाला बेदम मारहाण केल्याची घटना
घडली होती. या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी जामनेर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतू गुन्ह्यातील संशयिताचा खुनाचा उद्देश नसल्याने सहा संशयितांना न्यायालयाने सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरवून प्रत्येकी १० वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी १ हजार रुपये दंड ठोठावला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कापुसवाडी येथील कैलास भिका नवघरे यांचा शालक विनोद वाघमारे याला प्रविण ज्ञानदेव गोपाळ यांच्या घराच्या जागेत काही दिवसांसाठी जागा दिली होती. याठिकाणी तो घर बांधण्याच्या विचारात होता. यावेळी प्रविण गोपाळ, त्याचे आई-वडील यांनी विनोदला जागा खाली करण्याचे सांगितले होते. त्या कारणावरून दि.८ एप्रिल २०१२ रोजी दुपारी कैलास नवघरे व देविदास नवघरे या दोघांनी प्रविण याचा चुलत भाऊ राजु गोपाळ याला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली होती. या प्रकार रात्री प्रविणला माहिती पडल्यानंतर त्याने गावातील रतन नवघरे यांच्या घरासमोर येवून स्वताच्या कुटुंबियांना शिवीगाळ करीत विनोदला आपल्या जागेत राहु दिल्याने देविदास व कैलास नवघरे यांनी भाऊ राजुला मारहाण केली आहे असे म्हटले. या राग आल्यानंतर याचठिकाणी देविदास भिका नवघरे यांने त्याच्या हातातील लाठी-काठीने प्रविणला बेदम मारहाण केली. यावेळी कैलास भिका नवघरे, शिवराम नवघरे, उत्तम नवघरे, शिवदास नवघरे, विलास नवघरे रा. सर्व कापुसवाडी यांनी देखील प्रविणला मारहाण करीत रक्तबंबाळ केले होते. यावेळी प्रविणचा भाऊ राजू हा देखील भांडण सोडविण्यासाठी गेला असता, त्याला देखील मारहाण करण्यात आली होती. या भांडणातून प्रविण जीव वाचवून घराकडे पळत असतांना संशयितांनी त्याचा पाठलाग करून ग्रामपंचायतीजवळील विहीरीजवळ देविदास नवघरे याने रक्तबंबाळ प्रविणला पुन्हा काठी मारली व तो विहीरीत पडल्याने मयत झाला होता.
याप्रकरणी जामनेर पोलिसात मयत प्रविणचा चुलत भाऊ राजु भिवसन गोपाळ याच्या फिर्यादीवरून देविदास नवघरे, कैलास नवघरे, शिवराम नवघरे, उत्तम नवघरे, विलास नवघरे, शिवदास नवघरे यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याच्या खटल्याचे कामकाज न्या. आर.जे.कटारिया यांच्या न्यायालयात झाले.
यांच्या साक्षी ठरल्या महत्वपूर्ण
या गुन्ह्याच्या खटल्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर या गुन्ह्याच्या खटल्याप्रकरणी न्यायालयात फिर्यादी राजु गोपाळ, मयत प्रविणची आई सुमनबाई, तपासधिकारी डी.के.शिरसाठ यांच्यासह प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या साक्षी व सबळ पुराव्यांवरून न्यायालयाने सर्व संशयितांना सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात दोषी ठरविले. सरकारपक्षातर्फे ऍड. केतन ढाके, सुरेंद्र काबरा, तत्कालीन सरकारी वकील ऍड.नितीन देवराज यांनी कामकाज पाहिले. यावेळी पैरवी अधिकारी पोहेकॉ. शालिग्राम पाटील यांनी सहकार्य केले.