सुरक्षा रक्षक नेमण्याचे आश्वासन ; गुन्हेगारांवर होणार कठोर कारवाई
भुसावळ – रेल्वे रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महिलेला सलाईन लावण्यास उशीर झाल्याच्या कारणावरून कर्मचार्याला आडदांड प्रवृत्तीच्या लोकांनी बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी रात्री घडली होती. गुरुवारी या घटनेचे कर्मचारी सकाळी कामावर आल्यानंतर पडसाद उमटले व त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले. सकाळी आठ वाजेपासून सुरू असलेले आंदोलन दुपारी एक वाजेच्या सुमारास मागे घेण्यात आले. रेल्वे रुग्णालयात तूर्त रेल्वे सुरक्षा बलाची गस्त राहील, आठवडाभरात खाजगी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील तसेच आडदांड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य चिकित्सा अधिकारी जॉर्ज थॉमस यांनी कर्मचार्यांना दिल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले.
मारहाण झाल्याने केले काम बंद
रेल्वे रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक चारमधील एका महिला रुग्णास डॉक्टरांनी सलाईन लावण्यास सांगितल्यानंतर त्यास दहा मिनिटे उशीर झाल्याने महिला रुग्णाच्या नातेवाईक असलेल्या तरुणाने मेल नर्स पंकज कुमार यांच्याशी बुधवारी हुज्जत घालत धमकी दिली तर रात्रभ 10 वाजेच्या सुमारास पंकज यांना सात ते आठ जणांनी मारहाण केल्याने त्यांना आयुसीयुमध्ये दाखल करण्याची वेळ आली. गुरुवारी ही घटना कळताच कर्मचार्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले. काही दिवसांपूर्वी राजस्थान येथून पंकज कुमार येथे आल्याचे सांगण्यात आले.
सीआरएमएस पदाधिकार्यांची चर्चा सीआरएमएसचे विभागीय सचिव एस.बी.पाटील, चेअरमन पी.के.गुप्ता, सहाय्यक सचिव एम.के.सिंग, सिनी.डीएमओ डॉ.सिद्धेश, चीफ मेट्रन थुल, वाहिद खान, नंदकिशोर उपाध्याय, सुरेंद्र जैस्वाल यांच्यासह एनआरएमयुचे सचिव अरुण धांडे, किरण सोनवणे, दीपक कागदे आदींनी मुख्य चिकित्सा अधिकारी जॉर्ज थॉमस यांच्याशी या विषयी चर्चा करून दखल घेण्याची विनंती केली. शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह कर्मचार्यांनी नेमका प्रकार समजून घेतला व कारवाईचे आश्वासन दिले.
बबलूविरुद्ध अदखलपात्र गुन्हा मेल नर्स पंकजकुमार यांना मारहाण केल्याप्रकरणी बबलूविरुद्ध शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे.