जळगाव । मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटप करून घरी जात असतांना शिवाजी उद्यानाजवळ रविवारी रात्री 9.45 वाजेच्या सुमारास रिक्षातून आलेल्या सहा जणांच्या टोळीने अरूण काशिनाथ सोनार (वय-60रा. जुने भगवान नगर) या वृध्दास मारहाण करून त्यांच्याजवळील 48 हजार 800 रुपये व मोबाईल असा 49 हजार 800 रुपयांचा ऐवज लूटून नेण्यात आला होता. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीसांनी दिवसभर शोध मोहिम राबवत वृध्दास मारहाण करून लुटणार्या सहा संशयितांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
यांना केली अटक
सोनार यांनी पोलीस निरीक्षक सुनिल कुर्हाडे यांच्याकडे घटना कथन केल्यानंतर कुर्हाडे यांनी उपनिरीक्षक रोहन खंडागळे, गुन्हे पथकाचे शरद भालेराव, विजय नेरकर, गोविंदा पाटील, जितेंद्र राजपूत, अशरफ शेख, अशोक सनगत यांचे पथक संशयितांच्या शोधार्थ रवाना केले. यानंतर दिवसभर शोध मोहिम राबविल्यानंतर पथकाने शेख इरफान उर्फ मोगली शेख गुलाम (वय-22), अफजल उर्फ फावड्या राशिद खान (वय-20), शेख फयाज उर्फ फज्या शेख समशोद्दीन (वय-28), जाफर खान इकबाल खान (वय-21), सैय्यद सलमान सैय्यद काशीम (वय-23), शेख अशफाख शेख असलम (वय-19) सर्व रा. तांबापुरा यांना तांबापुरा येथून अटक केली आहे.
न्यायालयीन कोठडीत रवागनी
अरूण सोनार या वृध्दास मारहाण करून लुटणार्या शेख इरफान उर्फ मोगली शेख गुलाम, अफजल उर्फ फावड्या राशिद खान, शेख फयाज उर्फ फज्या शेख समशोद्दीन , जाफर खान इकबाल खान, सैय्यद सलमान सैय्यद काशीम, शेख अशफाख शेख असलम या संशयितांना मंगळवारी एमआयडीसी पोलीसांनी न्या. प्रतिभा पाटील यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्या. पाटील यांनी या सहा संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली असून याप्रकरणी सरकारपक्षातर्फे अॅड. अनिल गायकवाड यांनी कामकाज पाहिले.
अशी घडली घटना
अरूण सोनार यांच्या मुलाचे 20 जानेवारीला रोजी लग्न आहे. त्यामुळे सोनार हे लग्न पत्रिका वाटप करण्याचे काम करीत होते. रविवारी रामेश्वर कॉलनीतील नातेवाईकांकडे पत्रिका देऊन दुचाकीन घराकडे जात असतांना शिवाजी उद्यानाजवळ रिक्षातून आलेल्या सहा तरूणांनी सोनार यांना काका इकडून जाऊ नका, पुढे रस्ता खराब आहे असे सांगून पुढे रस्त्यात थांबवून काही क्षणातच त्यांनी सोनार यांना पकडून ठेवत मारहाण केली. यात त्यांच्याजवळ असलेले 48 हजार 800 रुपयांची रोकड व हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण 50 हजारांचा ऐवज तरूणांनी लुटून नेला.