पुणे । मैत्रिणीशी ओळख करून न दिल्याने सिम्बायोसिस महाविद्यालयात शिकणार्या तरुणाच्या डोक्यात वीट घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाचा जामिन न्यायालयाने फेटाळला. विशेष न्यायाधीश एल.एल. येनकर यांनी हा आदेश दिला आहे.प्रणव विलास दातार (25, कोथरूड) असे तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात अमोघ अजित रानडे (26, कोथरूड), गुरबिरसिंग धरमविरसिंग लांबा (39,वानवडी), प्रशांत ऊर्फ बाळा माधव मांडेकर (32) आणि अदित्य नितीन कंधारे (24, रा. कोथरूड) या चौघांनाही अटक करण्यात आली आहे.
ही घटना कोरेगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये 5 जुलैला मध्यरात्री घडली. याबाबत 21 वर्षीय तरुणाने मुंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे. फिर्यादी, त्याचा मित्र आणि दोन मैत्रिणी एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. त्यावेळी दातार याने मैत्रिणीशी ओळख करून दे, तुला दारू पाजतो, असे फिर्यादीला म्हटले. मात्र, फिर्यादीने यास नकार दिला. त्यावेळी फिर्यादी आणि त्याच्या मित्राला शिवगाळ आणि मारहाण करण्यात आली. त्यांच्या एका मैत्रिणीचा विनयभंग करण्यात आला. त्यावेळी आरोपींनी फिर्यादींना बेल्टने मारहाण केली. दातार याने डोक्यात वीट घालून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यापैकी दातार याने जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. या अर्जास अतिरिक्त सरकारी वकील पुष्कर सप्रे यांनी विरोध केला.