मारहाण केल्याप्रकरणी जामीन फेटाळला

0

जळगाव । आरोपीवर यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यात फिर्यादीच्या बाजूने मदत केल्याप्रकरणी एकाच्या डोक्यावर लोखंडी विळा मारुन दुखापत केल्याप्रकरणी मेहुणबारे ता.चाळीसगाव पो.स्टे.ला गुन्हा दाखल होता. याप्रकरणी आरोपीने न्यायालयात केलेल्या जामीनासाठी अर्ज नामंजूर केला आहे. ज्ञानेश्‍वर पुंडलिक पाटील (वय 50, रा. बोरखेडा, ता.चाळीसगाव) यांना 26 जानेवारी 2018 रोजी सकाळी 7 वाजता आरोपी एकनाथ चिंधा पाटील, त्र्यंबक चिंधा पाटील, संतोष धुडकू पाटील यांनी गावातील ग्रामपंचायतीसमोर मागील कुरापत काढत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत डोक्यात विळा मारुन गंभीर जखमी केले. तसेच शिवीगाळ करुन लाठ्याकाड्यांनी मारहाण करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मेहुणबारे पोलिसात तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तिन्ही आरोपींना 21 एप्रिलला अटक करण्यात आली होती. त्यानंतर साक्षीदार, आरोपी व फिर्यादी यांचे जाबजबाब नोंदविण्यात आले होते. याबाबत आरोपी एकनाथ चिंधा पाटील यांनी जामीनअर्ज दाखल केला असता न्यायालयाने तो फेटाळला. सरकारपक्षातर्फे सरकारी जिल्हा वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी कामकाज पाहिले.