मुंबई । मंत्रालयात मारहाण झालेला शेतकरी रामेश्वर भुसारे याच्यासोबत घडलेल्या घटनेचे पडसाद शनिवारी अधिवेशनातील दोन्ही सभागृहांत उमटले. या मुद्द्यावरून विरोधक पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला. विधान परिषदेत राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सरकारच्या या विकृतीवर ताशेरे ओढलेच मात्र, काँग्रेस गटनेते शरद रणपिसे यांनी तर घटनाक्रमाद्वारे त्याची संपूर्ण कैफियत सभागृहापुढे मांडली. मारहाण झालेले शेतकरी रामेश्वर भुसारे यांना भेटायला गेलेल्या विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलीस अधिकार्यांनी खोटी माहिती दिल्याने विरोधकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटायला गेलेल्या त्या शेतकर्यासोबतचा घटनाक्रम सांगितला.
मंत्रालयात गेल्यावर रामेश्वर भुसारे हे प्रथम मंत्री सदाभाऊ खोत यांच्याकडे गेले. मात्र, त्यांचे गार्हाणे ऐकल्यानंतरही सदाभाऊ खोत यांनी आपले हात झटकले. आपण याबाबत काहीही करू शकत नाही, असे सांगत आपली निष्क्रियता दर्शवली. संबंधित विषय आपल्या कार्यकक्षेत येत नाही, असे सांगत त्यांनी त्याला मदत करण्यास नकार दिला. पुढे साध्या पोशाखातील पोलिसांनी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याकडे घेऊन जातो, असे सांगत त्याला उदवाहनात मारहाण केल्याचे त्या शेतकर्याने सांगितले. विरोधक रामेश्वर भुसारे याला भेटायला गेलेले असताना त्याच्या ओठाला सात टाके पडले होते, त्याचा शर्ट रक्ताने माखला होता आणि त्याला एका अंधार्या खोलीत डांबून ठेवले होते, असे रणपिसे यांनी केले. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीने पुढे ही सारी माहिती देऊनही पोलिसांनी त्याचा एफआयआर लिहून घेतला नाही, हे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यामुळे हा सारा घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून त्याची चौकशी करून याचा अहवाल सरकारने सादर करावा आणि त्या शेतकर्याला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.
पोलीस आणि सरकारच्या उलट्या बोंबा
यापुढेही जाऊन पोलिसांनी या शेतकर्याला पोलीस स्टेशनला नेताना दोन हातांवर, दोन पायांवर बसवून त्याच्या गमछाने त्याचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्या शेतकर्याच्या खुनाचा प्रयत्न केला, असा आरोप शरद रणपिसे यांनी केला. पोलीस आणि सरकारचे हे कथन म्हणजे उलट्या बोंबा आहेत. हा हत्येचा प्रयत्न आहे. मात्र, शेतकर्यानेच आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत त्यांनी गुन्हा नोंदवला असल्याची माहितीही रणपिसे यांनी दिली.