मारहाण प्रकरणी कोरपावलीच्या तिघांना दोन वर्षे सक्तमजुरी

0

यावल न्यायालयाचा निकाल ; सरकारी वकीलांचा युक्तीवाद ठरला प्रभावी

भुसावळ- आमच्या रस्त्यातून जाऊ नको, असे म्हटल्याचा राग येऊन आरोपींनी फिर्यादीसह त्याची आई व भाऊ यांना मारहाण केल्या प्रकरणी यावल न्यायालयाने तिघा आरोपींना दोन वर्षे सक्तजुरीची व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा 28 रोजी सुनावली. खटल्याबाबत माहिती अशी की, कोरपावली, ता.यावल येथे 19 सप्टेंबर 2015 रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास फिर्यादी अजीज नजीर तडवी हा त्याचया घराजवळ उभा असताना आरोपी हारून रमजान तडवी हा फिर्यादीच्या जागेतून जात असताना फिर्यादिने त्यास हटकल्याचा आरोपीला राग आला. त्यावेळी आरोपी हारून रमजान तडवी, खलील रमजान तडवी, शरीफ रमजान तडवी यांनी एकत्र येऊन लाकडी दांड्याने व लाथाबुक्क्यांनी अजीज नजीर तडवी, वजीर नजीर तडवी व शाबजान नजीर तडवी यांना मारहाण करून जबर जखमी केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर यावल न्यायालयात या खटल्याचे कामकाज चालले. या खटल्यात सरकारी वकील नितिन खरे यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले व युक्तीवाद केला. सर्व आरोपींना दोन वर्षे स्तमजुरीची व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची तसेच दंड न भरल्यास अजुन पंधरा दिवसांची शिक्षा सुनावली. तसेच दंडाच्या रकमेतून प्रत्येकी एक हजार असे तीन हजार रुपये तिघा जखमी साक्षीदारांना देण्याचे आदेश न्या.डी.जी.जगताप यांनी दिले. सरकारी वकील नितिन खरे यांनी केलेला युक्तिवाद प्रभावी ठरला. त्यांना याकामी केस वॉच शेख अलीम व पैरवी दुर्योधन साबळे यांनी मदत केली.