मारुती सुझुकीच्या 13 कामगारांना जन्मठेप

0

नवी दिल्ली । मानेसर येथील मारुती सुझूकी प्रकल्पामध्ये 2012 साली झालेल्या हिंसाचाराच्या खटल्यात न्यायालयाने 13 जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. 2012 मध्ये वादातून कामगार आणि व्यवस्थापनामध्ये संघर्ष झाला होता. त्यानंतर हिंसाचार उसळला होता. त्यामध्ये एका व्यवस्थापकाचा जळून मृत्यू झाला होता. या घटनेमुळे उद्योगविश्वात खळबळ उडाली होती.

550 कायम कामगारांना घराचा रस्ता
अतिरिक्त न्यायाधीश आर. पी. गोयल यांनी निकाल वाचून दाखवला. चार दोषींना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यांनी चार वर्षांची शिक्षा भोगली आहे. 14 आरोपींना दंड भरण्यास सांगून त्यांची सुटका करण्यात आली आहे. मानेसर मारुती प्रकल्प या हिंसाचारामुळे काही काळासाठी बंद पडला होता. 12 जुलै 2012 रोजी कामगार आणि व्यवस्थापकांमध्ये वाद झाला. याचे रुपांतर भांडणात झाले आणि काही कामगारांनी चिडून फॅक्टरीच्या एका मजल्याला आग लावली. एच. आर. मॅनेजर अवनीश कुमार देव यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला होता. अनेक जण जखमी झाले होते.या हिंसाचारामुळे कंपनीचे मोठे नुकसान झाले होते. पोलिसांनी 147 कामगारांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यांच्यावर हत्येचा कट रचण्याचा, दंगल करणे आणि हिंसाचार करणे असे आरोप लावण्यात आले होते.

नव्या कामगारांसह प्रकल्प सुरू
18 जुलै रोजी किरकोळ कारणावरुन तेथील कामगार आणि व्यवस्थापकांमध्ये वाद झाला होता. तेथील व्यवस्थापकाने एका कामगाराच्या थोबाडीत मारली म्हणून हा वाद सुरू झाला होता असे काही जणांचे म्हणणे आहे. गेल्या काही वर्षांतील उद्योग क्षेत्रामध्ये घडलेली एक मोठी हिंसाचाराची घटना म्हणून याकडे पाहले जात होते. आता सध्या नव्या कामगारांसह प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आला आहे.