पत्रकार आणि विचारवंत हे समाजातील दुष्ट घटकांना नेहमीच शत्रू वाटत असतात. कारण, हे घटक सत्याला उजेडात आणण्याचे काम करतात. हे दोन घटक समाजातून वजा केले तर चोहीकडे नुसता अंधकार होईल. हे समाजजीवन धोक्यात येईल; त्यामुळे हे दोन्ही घटक जीवंत राहिले पाहिजेत, त्यांना काम करण्यास पुरेशी मोकळीक मिळायला हवी. ते निकोप, निर्भयपणे काम करत राहिले तरच समाजाचे भले होईल. दुर्देवाने जगभरात या दोन घटकांनाच ठार मारण्यासाठी समाजातील एक मोठा वर्ग सातत्याने सक्रीय असल्याचे दिसून आले आहे. या घटकाची क्रियाशिलता मानवजातीला मोठा कलंक आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही काही नवखी घटना नाही. त्या काही पहिल्याच शहीद पत्रकार वा सामाजिक कार्यकर्त्या नाहीत, असे अनेक शहीद यापूर्वीही होऊन गेलेत, भविष्यातही असे शाहिदत्व अनेकांना येत राहील. जोपर्यंत दृष्ट आणि समाजातील चांगली माणसे यांच्यातील द्वंद कायम आहे; तोपर्यंत अशा हत्या होतच राहणार आहेत. त्या टाळायच्या असतील तर समाजानेच चांगल्या लोकांना, पत्रकारांना आणि विचारवंतांना संरक्षण द्यायला हवे. समाजाला माणुसकीच्या मार्गावर नेणारे, कुप्रथांची जळमटे दूर सारणारे त्यासाठी आपले संपूर्ण जीवन कारणी लावणारे विचारवंत हे कुपमंडूक प्रवृत्तीच्या दृष्टांसाठी मोठे शत्रू असतात. त्यामुळेच अगदी संत तुकाराम ते महात्मा गांधी आणि डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्या निर्घृण हत्या करण्यात आल्यात. या हत्या काही एका व्यक्तीच्या हत्या नव्हत्या. समाजाच्या विज्ञाननिष्ठ, तर्कनिष्ठ विचार करण्याच्या प्रक्रियेला लगाम कसण्यासाठी हेतुपुरस्सर आणि नियोजनबद्धपणे करण्यात आलेल्या त्या सामाजिक विचारांच्या हत्या आहेत.
गांधी असेच संपविले, मार्टीन ल्यूथर किंगही असेच संपविले, सफदर हाश्मी आणि तुकोबाही या लोकांनी असेच संपविले. म्हणून काय या लोकांचे विचार मेले काय? नाही हे विचार आजही जीवंत आहेत, ते आ-चंद्रसूर्य जीवंत राहतील. मारेकर्यांनी या लोकांचा गोळ्या घालून देह संपविला; परंतु ते विचार संपवू शकले नाहीत. या समाजशहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातूून असंख्य गांधी अन् तुकोबा निर्माण झाले. हा भारत देश आणि इथला समाजच नव्हे तर जगभरात त्यांचे विचार वायूवेगाने प्रवाहित झाले. हे जग आज टिकून आहेत, ते या शहिदांच्या विचारावरच, याची जाणिव मारेकरी ज्या वंशातून, ज्या प्रवृत्तीतून आले होते, त्यांच्या आजच्या विद्यमान वंशालादेखील ठावूक आहेत. गांधीजी या शब्दाबद्दल ज्यांच्या मनात घृणा आहे त्या पंथाचे लोकचं अलिकडे झालेल्या सर्व समाजसुधारक, विचारवंत आणि पत्रकारांच्या हत्येचे कर्तेधर्ते आहेत. भारतात लोकशाही आहे, प्रत्येक नागरिकाच्या जीविताचा हक्क हा लोकशाहीत मूलभूत हक्क आहे. मग् ती व्यक्ती कोणत्याही विचारधारेची का असोत. तिचा सत्ताधार्यांच्या विचाराला प्रखर विरोध असला तरी तिच्या जीविताची जबाबदारी लोकशाहीने सत्ताधारीवर्गावरच सोपविलेली आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा, लेखन-भाषण स्वातंत्र्याचा, आणि समाजसुधारणांसाठी काम करण्याचा अधिकार आहे; हा अधिकार राज्यघटनेनेच दिलेला आहे. भारतीय राज्यघटना प्रत्येकाला माणूस म्हणून जगण्याचा, विज्ञानवादाचे, चिकित्सेचे, प्रत्येक घटनेमागील कार्यकारणभाव शोधण्याचे अधिष्ठान मान्य करते व तसा अधिकार देते. हा अधिकार लोकांना मिळाल्याबद्दल या देशातील एका सनातनीवर्गाला मोठाच पोटशूळ निर्माण झाला आहे. त्यामुळेच ही मंडळी फॅसिझमवर उतरते, आणि गौरी लंकेश असोत की दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांना गोळ्या घालून संपविण्याचे काम करते.
एकापाठोपाठ झालेल्या या हत्यांमुळे आज देशातील वातावरण दूषित झाले आहे. ज्यांनी या हत्या घडवून आणल्यात त्यांच्या नसानसांत रक्ते वाहते की द्वेष? असा प्रश्न आम्हाला पडला आहे. कोणतीही हत्या ही निषिद्धच आहे; वैचारिक विरोधातून जर ती होत असेल तर ती तीव्र निषेधार्ह आहे. गौरी लंकेश असोत की केरळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या होणार्या हत्या असोत, या सर्व हत्या निषेधार्हच आहेत. विचारांचा विरोध हा विचारानेच व्हायला हवा. हा विरोध जेव्हा बंदुकीच्या जोरावर होतो तेव्हा मानवता, समाजव्यवस्था आणि राष्ट्रच धोक्यात आलेले असते. सद्या या भारताचे असेच झाले आहे. कोणकोणत्या हत्यांचा उहापोह करावा? फॅसिझमच्या विखारी विचारसरणीतून होणार्या हत्यांचा, धार्मिक द्वेषातून होणार्या हत्यांचा, की गायीला वाचविण्याच्या उन्मादातून होणार्या मनूष्यहत्यांचा? या देशात काय चालू आहे हे कळेनासे झाले आहे. पाच वर्षात नक्षलवाद्यांनी साडेतीन हजार जणांच्या हत्या केल्यात, काश्मीर खोर्यात फुटिरतावाद्यांनी साडेदहा हजार हत्या केल्यात, तर लाखोने हत्या या जातीय दंगलीत झाल्या आहेत. विचारवंतांच्या हत्यांबद्दल चर्चा घडतात; परंतु इतर हत्यांबद्दल कुणाला काहीच सोयरसूतक का वाटत नाही? मरणारी माणसे निरपराध आहेत, त्यांच्या मृत्यूचे मोल कसे कुणाला नाही? गौरी लंकेश यांची हत्या ही पत्रकारितेचा वसा त्यांनी जोपासला; किंबहुना तो अधिक प्रामाणिकपणे जोपासला म्हणून झाली. ती एखाद्या विचारसरणीतून झाली असे म्हणणे तूर्त तरी चुकीचे ठरेल. एका मोठ्या नेत्याचा त्या गौप्यस्फोट करणार होत्या; तत्पूर्वीच त्यांना संपविले गेले, असे आता तपास यंत्रणांकडून कळते आहे. सत्य काय ते उघड होईलच; परंतु हत्येची घटना चुकीची असून, त्या पत्रकारिता करताना शहीद झाल्यात हे सत्य आहे. त्याहीपेक्षा दुर्देवाची बाब अशी की, त्यांच्या हत्येनंतर सोशल मीडियावर एका गटाने जी मते मांडली, ती संतापजनक होती. त्यांना ‘कुतिया कुत्ते की मौत मर गयी’ असे जेव्हा सोशल मीडियावर म्हटले गेले, तेव्हा अशा प्रकारे टीका करणार्यांच्या बुद्धीची कीव येते. हा तोच भारत देश आहे का? जेथे कर्मपूज्यता पाळली जाते. जेथे स्त्रियांना देवतास्वरुप मानले जाते. इंग्रजांचा वरवंटा या देशात फिरत असतानाही आपण संस्कार सोडले नाहीत. आज स्वातंत्र भारतात माणसे इतकी संस्कार अन् संवेदनशून्य कशी झालीत? जे आहे ते उद्विग्न करणारे आहे. विचारद्वेषातून होणारी हत्या जितकी निषेधार्ह आहे; त्यापेक्षाही या हत्यांवर आपण किती खालच्या पातळीवर जाऊन मते व्यक्त केलीत ती बाब ठरते. जगाच्या पाठीवर एकमेव असा आपला देश आहे, ज्याने गेल्या दहा हजार वर्षात कधीच अन्य देशावर धर्म, विचारविरोध या मुद्द्यांवर आक्रमण केले नाही. इतर धर्मीय आपला धर्म पसरविण्यासाठी युद्धाच्या नावाने जेव्हा हत्याकांड घडवित होते, तेव्हाही भारतीयांनी असा मार्ग अनुसरला नाही. भारतीयांचा इतिहास सोडून इतर धर्मियांचा इतिहास पाहिला तर त्यात विविध काळात केलेल्या लाखो हत्यांचा, क्रूरतेचा, बलात्कारांचा, जिंकलेल्या प्रदेशातील स्त्री-पुरुषांना गुलाम म्हणून विकण्याच्या हजारो नोंदी आहेत. फक्त अनादी काळापासून भारत हा एकमेव असे राष्ट्र आहे, ज्याने सर्वांच्या विचाराचा, धर्मांचा आणि वैविध्याचा सन्मानच केला. त्याने कधीही कुणावर अत्याचार केले नाहीत, कुणाच्या हत्या केल्या नाहीत की कुणा अबलेवर बलात्कार केले नाहीत. स्वतःच्या विचारांशी प्रखर विरोध करणारे जेव्हा मैदानात नंग्या तलवारी घेऊन उभे होते; तेव्हाही या देशाने विचारांना विरोध म्हणून आपल्या तलवारी उपासल्या नाहीत. तरीही येथील विचार आणि सत्य हे जगाने स्वीकारले. या सत्यांनी ओतप्रोत भरलेल्या हिंदू संस्कृतीबद्दल जगाला हेवा वाटतो. या संस्कृतीतून जन्माला आलेले बौद्ध, शिख, जैन हे धर्म जगाला आदर्श वाटतात. रक्ताचा थेंबही न सांडवा लागता बौद्ध धर्म अर्ध्या जगाने स्वीकारला. पाकिस्तानसारखा धर्मनिंदेच्या (ब्लास्फेमी) कायद्याचे कोलीत या देशाने कधीच हाती घेतले नाही. धार्मिक बहुसंख्याकांच्या श्रेष्ठत्वाचा गैरफायदाही या देशात कुणी घेतला नाही. हा भारताचा देदीप्यमान इतिहास आहे. हा गौरवशाली इतिहास आहे. या इतिहासाला, या परंपरेला काळिमा फासण्याचे काम आज एक द्वेषमुलक विचारसरणी या देशात करत असेल तर त्या विचारसरणीला आता समाजानेच सक्तीने मूठमाती द्यायला हवी.
बरे, ही विचारसरणी केवळ सत्तधारी भाजपमध्येच आहे, असे नाही. ती सर्वच राजकीय पक्षांत आहे. त्यामुळेच विचारवंत आणि पत्रकारांच्या हत्या घडत असताना निव्वळ राजकीय चिखलफेक करण्याव्यतिरिक्त पुढे काहीही घडत नाही. गांधी मारलेत, या द्वेषमुलक विचारसरणीने काही कालावधीनंतर त्यांचे फोटो आपल्याच विचारपीठावर लावून मिरवले. सज्जनांच्या मार्गात अडथळे निर्माण करायचे, त्यांचा काटा काढायचा आणि नंतर त्याच सज्जानांचे फोटो घेऊन मिरवायचे, स्वतःची विचारसरणी त्याच्या नावाने खपवायची, हे या द्वेषमूलक विचारसरणीचे काम राहिले आहे. देशाला धोका या मंडळींपासून असून, त्यामुळे त्यांना समाजातून आता खड्यासारखे बाजूला सारावे लागणारच आहे. हे या देशाचे दुर्देव आहे की, ही विचारसरणी आता पूर्णक्षमतेने सत्तेवर आली. ते सत्तेवर नसले तरी जे कुणी सत्तेत बसतात तेही त्यांच्याच डोक्याने चालणारे असतात. त्यामुळे समाजात क्रांतिकारक विचार पेरणारे, अंधश्रद्धेची जळमटे दूर करणारे, सत्य उजेडात आणणारे गोळ्या घालून संपविलेच जातात. मारेकरी हे जो विचार घेऊन चालत आहेत, तो विचार या देशाला गिळंकृत करणारा असून, लोकशाहीच्या मूळावर उठलेला आहे. त्यांचा द्वेष सनातन आहे, तो इतक्या सहजासहजी संपणारा नाही. त्यामुळेच गौरी लंकेश गेल्यात, उद्या आणखी कुणाचा क्रमांक लागेल. ज्यांनी गोळ्यांच्या जोरावर विरोधी विचार संपविण्याचा विडा उचलला आहे, त्यांना सागावेसे वाटते बाबाहो, तुमच्या गोळ्या, शस्त्रे एकवेळ संपतील. परंतु, मानवहिती विचारचक्र थांबणारे नाही. ते अनेकांच्या रुपाने पुन्हा पुन्हा प्रगट होतच राहणार आहे. भारतच नाही तर जगभरात सज्जन, विचारवंत जन्माला येतच राहतील. ते समाजाला दिशा अन् विचार देण्याचे काम करतच राहतील. तुम्ही किती लोकांना गोळ्या घालणार आहात? त्यांचे देह धारातीर्थी पडतील; परंतु त्यांचे विचार तुम्हाला मारता येतील का?
-पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, दैनिक जनशक्ति, पुणे