पिंपरी-चिंचवड । महिला अभियंता अंतरा दास यांची डिसेंबर 2016 मध्ये एकतर्फी प्रेमातून रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे येथे धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ज्याने हल्ला केला तो मुख्य आरोपी अजून पोलिसांना सापडलेला नाही. त्यामुळे या आरोपीची माहिती देणार्यास 25 हजारांचे बक्षीस पुणे ग्रामीण पोलिसांनी जाहीर केले आहे.
अंतरा दास या कामावरून घरी परतत असताना तळवडे येथे मारेकर्याने तिचा पाठलाग करून पाठीमागून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली व त्यातच तिचा मृत्यू झाला. हा हल्ला तिच्याच कंपनीत काम करणार्या संतोष कुमार याने एकतर्फी प्रेमातून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले होते. याप्रकरणी आरोपी त्याला देहूरोड पोलिसांनी बंगळुरुतून अटक केली होती.
मात्र संतोष कुमार याने हल्ला करायला ज्याला पैसे दिले होते तो मारेकरी सापडावा म्हणून पोलिसांनी नागरिकांना जाहीर आवाहन केले आहे की, निळ्या रंगाचा गोल गळ्याचा त्यावर पट्टे असलेला टीशर्ट व पॅन्ट घातलेल्या मारेकर्याबद्दल कोणालाही खात्रीशीर व उपयुक्त काही माहिती असेल तर त्यांनी पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या 9423884745, 9420827001, 9923481235, 9823232421 या क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणा-याचे नाव इतर माहिती गुप्त राखण्यात येईल.