जळगाव : खाजगी वाहनातून प्रवास करीत असलेल्या तरुणाचा आठ हजार रुपये किंमतीचा मोबाईल वाहनातील तीन जणांनी लांबविल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मार्केटींग करणार्या तरुणाचा मोबाईल हिसकावला
एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा येथे अमोल उखर्डू पाटील हा तरुण वास्तव्यास असून तो मार्केटिंग करतो. अमोल हा शुक्रवार, 10 जून रोजी पिंपळकोटा येथून जळगावला येण्यासाठी एका खाजगी वाहनात बसला. वाहनात अगोदरच तीन अनोळखी व्यक्ती बसलेले होते. जळगाव शहरातील मानराज पार्क जवळ अमोल हा वाहनातून उतरला. यावेळी वाहनातील अनोळखी पैकी एकाने शिवीगाळ करत अमोलच्या कानशिलात लगावली. त्यानंतर तो पुन्हा वाहनात जाऊन बसला. वाहनातून उतरलेल्या अमोलने त्याच्या खिशात हात घातला असता खिशात ठेवलेला मोबाईल आढळून आला नाही. वाहनातील तीन अनोळखी व्यक्तींनी मोबाईल चोरून नेल्याची खात्री झाल्यावर अमोल पाटील याने शनिवारी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक गणेश पाटील हे करीत आहेत.