मार्केट यार्डात कचरा, दुर्गंधीचे साम्राज्य

0

पुणे । श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड कचरा आणि दुर्गंधीच्या विळख्यात अडकले आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या विरोधात येत्या काही दिवसांतच आडते असोसिएशन आंदोलन करणार असल्याचा इशारा आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिला. या घाणीकडे बाजार समितीमधील अधिकार्‍यांचे ना पदाधिकार्‍यांचे लक्ष आहे़ या प्रश्नाकडे कानाडोळा का केला जात आहे. बाजारातील दुर्गंधीबाबत आडते असोसिएशनचे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. त्यांच्याशी सतत संपर्क साधला जात आहे. मात्र, ते कसल्याही प्रकारची दाद देत नसल्याचे भुजबख यांनी याबाबत माहिती देताना सांगितले.

पुणेकरांचे आरोग्य धोक्यात
पुणे बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती मानली जाते. मात्र, या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात जास्त घाणीचे साम्राज्य असल्याचे निदर्शनास येत आहे. तरकारी विभागातील 38 वर्षांच्या इतिहासात एवढी दुर्गंधी येथे कधीच नव्हती. सध्या शहरात साथीच्या आजारांनी थैमान घातले असून याच बाजारातील फळे आणि भाजीपाला प्रत्येक पुणेकरांच्या घरात जातो आणि याच ठिकाणी सर्वाधिक घाण, दुर्गंधी असल्याने त्याचा परिणाम थेट तसेच अप्रत्यक्षरित्या पुणेकरांच्या आरोग्यावर होत आहे, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

पैसा जातो कुठे?
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीस सेसच्या रुपाने करोडो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्या तुलनेतच त्यांनी बाजार घटकांना सर्वोत्तम मुलभूत सुविधा द्यायला पाहिजेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे स्वच्छता व मुलभूत सुविधांवर खर्च दाखविण्यात येतो. तो पैसा जातो कुठे, असा सवाल उपस्थित होत आहे़

आंदोलनाचा इशारा
करोडो रुपये खर्च करून पुर्नविकास केला जाणार असल्याच्या गप्पा बाजार समितीकडून मारल्या जात आहेत. मात्र, मुलभूत प्रश्न सोडविल्याशिवाय या प्रश्नावर चर्चा करण्यात येणार नाही. तसेच, हे प्रश्न न सुटल्यास वेळ पडल्यास आंदोलन देखील करण्याची आमची तयारी आहे.
– विलास भुजबळ, अध्यक्ष, आडते असोसिएशन

पालकमंत्र्याना घालणार साकडे
बाजारातील स्वच्छतेबाबतच्या प्रश्नाबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, पणन संचालक तसेच स्थानिक आमदारांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यांनी अचानकपणे बाजारात भेट देऊन येथील अस्वच्छतेची माहिती घ्यावी, अशी विनंती त्यांना करण्यात येणार आहे. दरम्यान आजुबाजूच्या दुर्गंधीमुळे शेतकर्‍यांनी पिकविलेला चांगला माला खरेदी करतानाही ग्राहक दर कमी करून खरेदी करत असल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे.