मार्क झकरबर्गचा माफीनामा

0

फेसबुक डाटा लिक झाल्याची दिली कबुली

कॅलिफोर्निया : फेसबुक डाटा चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आपली चूक मान्य केली असून, हा डाटा लिक झाल्याची कबुली दिली आहे. यासाठी जबाबदार असलेल्या गोष्टींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे, असे सांगत, यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपायदेखील केले जात असल्याचे त्याने सांगितले आहे.

झकरबर्गने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये त्याने डाटा लिक झाल्याचे मान्य केले आहे. कॅम्ब्रिजच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार झालेल्या डाटा चोरीचा शोध घेतला जात आहे. यासाठी आवश्यक सर्व उपाय केले जात असून, या घटनेसाठी आम्ही सर्वांची माफी मागत आहोत, असे झकरबर्गने स्पष्ट केले. आवश्यक ते उपाय करूनदेखील काही चुका राहिल्यामुळे ही घटना घडली. त्यामुळे यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी कबुलीही झकरबर्गने दिली.