भुसावळ आगारप्रमुखांच्या बेफिकीरीने संताप : लोकप्रतिनिधींनी दखल घेण्याची अपेक्षा
भुसावळ- भुसावळ आगारातून तालुक्यातील विविध मार्गावर धावणार्या बसेसवरील चालक मार्गावरील विद्यार्थ्यांची उचल न करताच धावत असल्याने विद्यार्थ्यांना इतर वाहनांचा आधार घेवून शाळा गाठावी लागते. या प्रकाराकडे आगारप्रमुखांनी लक्ष देणे आवश्यक आहे मात्र आगारप्रमुखांचे दुर्लक्ष होत असून याबाबतीत प्रवासी संघटनांचेही उदासीन धोरण असल्याचे दिसून येत आहे. यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.
एस.टी.च्या ब्रीदचा चालकांना विसर
राज्य परीवहन महामंडळाने प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद वाक्य घेवून राज्यातील प्रत्येक मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी बसेस सुरू केलेल्या आहेत मात्र परीवहन महामंडळाकडून प्रवाशांची व विद्यार्थ्यांची गैरसोय केली जात आहे. यामध्ये बसेस वेळेवर न धावणे, मार्गावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांची उचल न करणे यामुळे अनेकांना खाजगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यासाठी आगारप्रमुखांनी तालुक्यातील प्रत्येक शाळांवर जावून विद्यार्थ्यांशी हितगूज करणे व प्रवाशांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी प्रवाशी संघटनांची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे मात्र आगारप्रमुखांनी अद्यापपर्यंत एकही बैठक घेतलेली नाही तसेच याबाबतीत प्रवासी संघटनांचेही उदासीन धोरण दिसून येत असल्याने प्रवाशांचा कल खाजगी वाहनांकडे वळला असून परीवहन महामंडळाची चाके तोट्यात धावत आहे.
बसचालकांची मनमानी
भुसावळ आगारातून पहाटे सहा वाजता वरणगाव फॅक्टरी, बेटावद, बोदवड, मुक्ताईनगर, जळगाव जामोद अशा बसेस धावतात. यामुळे या मार्गावरील दीपनगर, कपिलवास्तू नगर, जाडगाव आणि फुलगाव येथील सकाळी सत्रातील विद्यार्थी व विद्यार्थिनी वरणगाव येथील शाळांमध्ये येण्यासाठी महामार्गावर येवून थांबतात मात्र बसचालक एक किंवा दोन विद्यार्थी दिसल्यास बस न थांबवता मनमानी पद्धतीने भरधाव वेगात पुढे निघून जातात. यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घेवून शाळा गाठावी लागत असल्याने बसचालकांच्या या मनमानी कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात आहे.
बसेसची संख्या वाढवणे आवश्यक
तालुक्यातील वरणगाव येथे येणार्या-जाणार्या विद्यार्थ्यांची व प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र भुसावळ व मुक्ताईनगरकडून येणार्या लांब पल्ल्याच बसेस वरणगावात थांबत नसल्याने प्रवाशांना व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी या मार्गावर शाळेच्या वेळेवर जादा सर्वसाधारण बसेस सोडणे आवश्यक आहे.
या मार्गावर विद्यार्थ्यांची संख्या अधिक
तालुक्यातील वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय, गंगाधर सांडू चौधरी माध्यमिक विद्यालय आणि कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बोदवड व अंजनसोंडे, तपत कठोरा व सावतर निंभोरा या भागातील विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र या मार्गावरीही बसेसची संख्या कमी असल्याने विद्यार्थी व प्रवाशांची गैरसोय होते. यामुळे त्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो. यामुळे प्रवासी व विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रवासी संघटनांचे उदासीन धोरण
प्रवाशांच्या समस्या जाणून त्यावर उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आगारप्रमुखांनी प्रवाशी संघटनांची बैठक आयोजित करणे आवश्यक आहे मात्र आगारप्रमुखांनी अद्यापही प्रवाशी संघटनांची बैठक घेतली नाही तर प्रवासीी संघटनांचेही याबाबतीत उदासीन धोरण असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बसचालकांची मनमानी वाढली असून बसचालकांकडून एक प्रकारे खाजगी प्रवासी वाहनांना प्रोत्साहन देण्याचा प्रकार सुरू आहे.
लोकप्रतिनिधींनी घ्यावा पुढाकार
शासनाकडून विद्यार्थ्यांना मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये अहिल्याबाई होळकर योजनेतंर्गत विद्यार्थिनींना 100 टक्के मोफत प्रवासाची सुविधा आहे मात्र बसचालकांच्या मनमानी कारभारामुळे लाभार्थी विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरीकांना असलेल्या सवलतीच्या प्रवासापासून वंचित रहावे लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी या प्रकाराकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.