मार्च अखेर पारा 40 वर ?

0

पुणे: 2017 हे वर्ष अतिशय उष्ण राहण्याची भाकिते करण्यात आली होती. या भाकितांची प्रचिती जानेवारी महिन्यापासूनच येण्यास सुरुवात झाली. मार्च महिन्यात अतिउष्णतेचा दाह जाणवू लागला असून या महिन्याच्या अखेरपर्यंत तो आणखी वाढत जाणार असल्याची शक्यता आहे. विशेषतः शहरात यंदाचा मार्च महिना उष्णतेचे नवे रेकॉर्ड नोंदवेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ वर्तवित आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागापेक्षा पाषाण आणि लोहगाव ह्या बाह्य भागात अधिक उष्णता जाणवत आहे. शहरात तापमान 37 अंश सेल्सियसपर्यंत जाऊन पोहचले आहे. आणि या महिना अखेरपर्यंत ते 40च्या घरात पोहचण्याची शक्यता आहे.

हवामानशास्त्राचा अभ्यास आणि अंदाज व्यक्त करणार्‍या ‘स्कायमेटवेदर’च्या अंदाजानुसार रोज तापमानात वाढ होत असून गेल्या एक आठवड्यात पारा चढाच राहिला आहे. रोजचा दिवस हा 2017मधील सर्वांत उष्ण दिवस सिद्ध होत आहे. त्याचप्रमाणे किमान तापमानातही प्रचंड वाढ होताना दिसत आहे. किमान तापमानही 18 अंश सेल्सियसच्या घरात पोहचले आहे. सध्या कोणत्याही प्रकारचा हवामानाचा दाब तयार होत नसल्याने आणि आकाश पूर्णपणे मोकळे असल्याने अत्यंत उष्णता जाणवत आहे. यामुळेच सध्या वाहत असलेले वारे देखील खूपच उष्ण आहेत. स्कायमेटने मार्च महिन्यात उष्णतेचे नवे उच्चांक स्थापित होण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. विशेषतः लोहगाव भागात ज्या पद्धतीने तापमान वाढत आहे, ते पाहता यंदाचा उन्हाळा खूपच तापदायक ठरणार असल्याचे दिसत आहे.