मार्च एन्डींगमुळे वसुलीचा धडाका

0

पिंपरी-चिंचवड : मार्च महिन्यात आर्थिक वर्ष संपत असल्याने वर्षभराचे उद्दिष्ट (टार्गेट) पूर्ण करण्यासाठी महापालिका, नगरपरिषद, कॅन्टोन्मेंट बोर्ड, महावितरण, आयकर विभाग, बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या व्यस्त आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार 100 टक्के वसुली करण्याची अधिकार्‍यांची धडपड सुरू आहे. त्या दृष्टीने कारवाई मोहीम तीव्र केली गेली आहे. एक एप्रिल ते 31 मार्च या कालावधीत बहुतेक सर्वच आर्थिक व्यवहार केले जातात. वर्षभराचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी मार्च महिन्यात संबंधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी व्यस्त झाले आहेत. महापालिका, नगरपरिषद, कॅन्टोन्मेंट बोर्डाचा सर्वात मोठा उत्पन्नाचा मार्ग म्हणजे मिळकतकर असतो. त्यांची वसुली जितकी जास्त तितके विकासकामे करणे सुलभ होते. त्यामुळे सर्वच कार्यालयांनी वसुलीसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

थकबाकी वसुलीसाठी प्रयत्न
संबंधित ग्राहकांना नोटीस देऊन 31 मार्चपूर्वी थकबाकी भरण्याचे सूचित केले गेले आहे. बहुतेक कार्यालयाच्या वतीने नोटिसा देऊन मोबाईलवर एसएमएस पाठवून थकीत बिल आणि कर भरण्याची आग्रही मागणी केली जात आहे. त्याचबरोबर वृत्तपत्र, रेडिओवर जाहिरात करून मुदतीमध्ये कर आणि बिल भरण्याबाबत जनजागृती केली जात आहे; तसेच गर्दीच्या ठिकाणी सूचनापर संदेश असलेले फ्लेक्स उभारण्यात आले आहेत.

जप्तीची कारवाई वेगात
नोटीस आणि मोबाईलवर संदेश देऊनही अनेक ग्राहक कर आणि बिल भरण्यास टाळाटाळ करतात, अशा नागरिकांची मालमत्ता जप्तीची कारवाई महापालिकेच्या मिळकतकर विभागाने तीव्र केली आहे. शहरातील 1 लाखांवरील थकबाकीदार मिळकतधारकांच्या मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई वेगात सुरू आहे. आतापर्यंत 40 मालमत्तांवर सील लावण्यात आले आहे. यामध्ये मॉल, हॉटेल्स, दुकाने, क्लासेस, बिगरनिवासी इमारतींचा समावेश आहे.

कार्यालयांच्या सुट्या रद्द
पाणीपट्टी न भरणार्‍या थकबाकीदारांचे नळजोड तोडण्यात आले आहेत. वीजबिल न भरलेल्या 350 ग्राहकांचे वीजजोड खंडित करण्यात आले आहेत. बँकांकडूनही कर्ज वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध कारवाया केल्या जात आहेत. थकबाकीदारांवर कारवाई करून कर्जाची वसुली केली जात आहे. प्रसंगी तारण असलेले वाहन, सदनिका जप्तीचे हत्यार उपसले जात आहेत. कोणत्याही परिस्थितीत 100 टक्के वसुली करण्याचे टार्गेट गाठण्यासाठी हरतर्‍हेने प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे काही कार्यालयांच्या सुट्या रद्द केल्या आहेत.