मार्टिन डेल पोत्रोने फेडररला चकवले

0

न्यूयॉर्क । अर्जेटिनाच्या जुआन मार्टिन डेल पात्रोने विम्बल्डन विजेत्या रॉजर फेडररला हरवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेत मोठी उलथापालथ केली आहे. या विजयासह पात्रोे स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नंबर वन रफाल नदालविरुद्धच्या लढतीचे तिकीट निश्‍चित केले आहे. या लढतीच्या निकालामुळे वर्षातील शेवटच्या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत बीग फोरमधील दोन मोठे चेहरे नदाल आणि फेडरर यांच्यातील संभाव्य सामन्याकडे लक्ष ठेवणार्‍या या दोघांच्या चाहत्यांची सपेशल निराशा झाली आहे. 24 वर्षीय पोत्रोने फेडररला नमवून अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील सारी समीकरणे बदलून टाकली आहेत. 2009 मध्ये फेडररला हरवून कारकिर्दीतील पहिली ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकणार्‍या पोत्रोने पुन्हा एकदा त्याच कोर्टवर त्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

जवळपास तीन तास खेळल्या गेलेल्या सामन्यात पोत्रोने फेडररचा 7-5, 3-6, 7-6, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीची लढत जिंकली. उपांत्य फेरीत पोत्रोचा सामना रशियाचा युवा खेळाडू आंद्रे रूबलेवला एकतर्फी सामन्यात 1-6, 2-6, 2-6 असे हरवणार्‍या नदालशी होईल. फेडररच्या पराभवामुळे नदाल आणि फेडररचे चाहते निराश झाले आहेत. नदाल आणि फेडरर याआधी सुमारे 37 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत पण ते न्यूयॉर्कमध्ये कधी आमने सामने आलेले नाहीत. नदालने उपांत्यपूर्व फेरीचा सामना जिंकल्यावर सगळ्याच्या नजरा फेडररकडे लागल्या होत्या. पण पोत्रोने सगळेच चित्र पालटवून टाकले.